वंदे मातरम् न बोलणे म्हणजे देशद्रोह नव्हे!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वंदे मातरम् म्हणायचे की नाही हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे. ते राष्ट्रीय गीत म्हणण्यास नकार देणाऱयांना देशद्रोही ठरवता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मांडली. त्यांच्याकडे संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक कल्याण या खात्याचा स्वतंत्र कार्यभार आहे.

वंदे मातरम् म्हणायचे की नाही हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. ज्यांना ते राष्ट्रीय गीत गायचे त्यांनी गावे. ज्यांना ते गायचे नसेल त्यांनी गाऊ नये, असेही ते म्हणाले.

बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या त्या राष्ट्रीय गीताला कोणी जाणूनबुजून विरोध करत असतील तर ते सुसंस्कृतपणाचे आणि देशाच्या हिताचे नाही, असे मत नक्वी यांनी व्यक्त केले.
संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष,
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे आमच्या भाजपचे नैसर्गिक मित्र आहेत.
z मुख्तार अब्बास नक्वी
केंद्रीय मंत्री