मुंबईत 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, दोन तासांच्या संततधारेमुळे मुंबईकरांची तारांबळ

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळी दोन तास जोरदार हजेरी लावल्यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. लोकल आणि रस्ते वाहतूक काहीशी मंदावली. मात्र, सखल भागात पाणी साचले नाही. त्यानंतर दिवसभरात पावसाचा जोर कमी राहिला. मात्र, पावसाची अधूनमधून रिपरिप सुरूच होती. दरम्यान, येत्या 24 तासांत आकाश ढगाळ राहणार असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.

मुंबईत जून कोरडा गेला, जुलैमध्ये मुसळधार आणि आता ऑगस्टचा अर्धा महिना संपत आला असताना हा महिनाही कोरडा जाणार असे वाटत असताना आज सकाळी 10 वाजता पावसाने जोरदार सुरुवात केली. सुरुवातीपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली ती सुमारे दोन तास सुरू होती. त्यामुळे लोकल आणि रस्ते वाहतूक काहीशी मंदावली. अचानक आभाळ भरून आल्याने आणि मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. छत्री जवळ असतानाही काहींनी बस स्टॉप, दुकानाबाहेरची जागा आणि काही जणांनी लोकलच्या स्थानकांवर थांबून राहणे पसंत केले. मुंबईत सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या दरम्यान 45.02 मिमी, पूर्व उपनगरांत 43.72 मिमी तर पश्चिम उपनगरात 53.63 मिमी पाऊस पडला.

एकाही ठिकाणी पाणी साचले नाही

मुंबईत तासाभराच्या अतिवृष्टीमुळे हिंदमाता, गांधी मार्केट, मिलन सब वे, वडाळा येथील सखल भागात पाणी साचत होते. मात्र, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हिंदमाता, गांधी मार्केट या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यास ते अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी बांधण्यात आलेल्या भूमिगत पाणी साठवण टाक्या आणि मिनी पंपिंग स्टेशनमुळे पाण्याचा निचरा वेगाने होऊ लागला आहे. त्यामुळे मुंबईत दोन तासांत मुसळधार पाऊस पडूनही एकाही सखल भागात पाणी साचले नाही.

14 ठिकाणी झाडे कोसळली, 4 ठिकाणी शॉर्टसर्किट

मुंबईत दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे घर आणि घरांची भिंत कोसळल्याची तर दोन ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली. जोरदार पाऊस आणि वार्यामुळे मुंबईत 3, पूर्व उपनगरात 3 तर पश्चिम उपनगरात 8 झाडे आणि झाडांच्या फांद्या कोसळल्या तर शॉर्ट सर्किटच्या 4 घटना घडल्या. मात्र, कोणत्याही घटनांमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.