राज्यात 123 कोटींची रोकड, दारू, ड्रग्ज जप्त

50

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत रोख रक्कम, मद्य, अमली पदार्थ, सोने-चांदीच्या स्वरूपात 123 कोटी 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सोमवारी दिली. त्यामध्ये 46 कोटी 62 लाख रुपयांची रोकड आहे तर तब्बल 3 कोटी लिटर दारूचा समावेश आहे.

पोलीस, आयकर विभाग, अबकारी कर विभाग आदी विभागांकडून केलेल्या कारवाईमध्ये 123 कोटी 75लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 46कोटी 62 लाख रुपये रोख, 23 कोटी 96 लाख रुपये किमतीची 3 कोटी 8 लाख 793 लिटर दारू, 7 कोटी 61लाख रुपयांचे मादक पदार्थ, 45कोटी 47 लाख रुपयांचे सोने, चांदी यांचा समावेश आहे.

आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत शस्त्र परवानाधारकाकडून 40 हजार 337 शस्त्र जमा करून घेण्यात आली आहेत. सूचना देऊनही जमा न केलेली 30शस्त्र जप्त करण्यात आली असून 135शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय 1 हजार 571विनापरवाना शस्त्र, 566 काडतुसे आणि 18 हजार 513 जिलेटीन अशा स्वरूपाचे स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

22 हजार गुन्हे दाखल

राज्यात आचारसंहिता भंग व निवडणूक प्रक्रियेशी निगडित इतर स्वरूपाचे 22 हजार 795 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामध्ये पोलीस विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाकडून दाखल करण्यात आलेल्या गुह्यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या