मुंबईतील 17 लाख उत्तर हिंदुस्थानी महायुतीच्या पाठीशी

1
bjp-shivsena

सामना प्रतिनिधी। मुंबई

मुंबईतल्या उत्तर हिंदुस्थानींनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचे पारडे जड झाले आहे. मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांत सुमारे 17 लाख उत्तर हिंदुस्थानी मतदार आहेत. मुंबईतल्या उत्तर हिंदुस्थानींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मतदान केले होते. या निवडणुकीतही उत्तर हिंदुस्थानी समाज महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे.

निवडणूक आयोगाकडील आकडेवारीनुसार मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांतील एकूण मतदारांची संख्या सुमारे 94 लाख 58 हजार 397 आहे. त्यापैकी उत्तर हिंदुस्थानी मतदारांची संख्या सुमारे 17 लाख आहे. त्यामुळे या समाजाचा मोठा प्रभाव मतदानावर पडतो. पूर्वी मुंबईतल्या उत्तर हिंदुस्थानी समाजातील मतदार काँग्रेसचे पारंपरिक मतदार म्हणून ओळखले जात होते. पण नंतर हा समाज महायुतीकडे आकृष्ट झाला. त्याचा प्रत्यय 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आला. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली आदी राज्यांमधील उत्तर हिंदुस्थानी समाज नोकरी-व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत स्थायिक झाला आहे. विकास, मुंबईतील सुरक्षित वातावरण आणि हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर हा समाज महायुतीकडे खास करून शिवसेनेकडे वळला आहे. गेल्या निवडणुकीत या समाजाने महायुतीला मोठय़ा प्रमाणावर मतदान केले होते. या लोकसभा निवडणुकीतही मुंबईतला उत्तर हिंदुस्थानी समाज महायुतीच्या बाजूने मतदान करील असे उत्तर हिंदुस्थानी संघाचे अध्यक्ष व आमदार आर. एन. सिंह म्हणाले.

मुंबईत उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात उत्तर हिंदुस्थानी मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. या मतदारसंघात उत्तर हिंदुस्थानींची संख्या अंदाजे साडेचार ते पावणेपाच लाख आहे. या उत्तर हिंदुस्थानींनी महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत.

मुंबईतील उत्तर हिंदुस्थानींची संख्या

दक्षिण मुंबई –      1 लाख 95 हजार ते 2 लाख 10 हजार
दक्षिण-मध्य मुंबई- 1 लाख 50 हजार ते 1 लाख 65 हजार
उत्तर-पूर्व मुंबई –   2 लाख 50 हजार ते 2 लाख 75 हजार
उत्तर-मध्य मुंबई-   2 लाख 73 हजार ते 2 लाख 85 हजार
उत्तर पश्चिम मुंबई-  4 लाख 50 लाख ते 4 लाख 75 हजार
उत्तर मुंबई –        2 लाख 50 हजार ते 2 लाख 75 हजार