मुंबईकरांनो सावधान, आज झाडाखाली उभे राहू नका!


सामना ऑनलाईन। मुंबई

गुजरातच्या किनाऱ्यावर गुरुवारी धडकणाऱ्या वायू या चक्रीवादळाच्या आगमानची चाहूल महाराष्ट्रातील किनार पट्टीला जाणवू लागली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी सकाळपासूनच जोरदार वारे वाहत असून अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याची शक्यता आहे. यामुळे पावसात भिजण्याचे टाळण्यासाठी झाडांखाली उभे राहू नका असा इशारा आपत्कालीन विभागाकडून मुंबईकरांना देण्यात आल्याचे खासगी वृत्तवाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे. तसेच मुंबई व राज्यातील मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

अरबी समुद्रावर घोंघावणारे वायू हे चक्रीवादळ मुंबईपासून 280 किमी अंतरावर असून दक्षिण पश्चिम क्षेत्रापर्यंत ते पोहचले आहे. यामुळे महाराष्ट्रातील उत्तर किनारपट्टी भागात ताशी 50-60 पासून 70 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच 12 ते 13 जून रोजी महाराष्ट्रातील किनारपट्टीभागाला या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्र किनारी जाऊ नका अशा इशारा मुंबई हवामान विभागाचे प्रमुख उप महानिदेशक (डीडीजी) के एस होसलीकर यांनी दिला आहे.