अमिताभ बच्चन यांचे ट्विटर हॅक

72

सामना प्रतिनिधी। मुंबई

बिग बी अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट सोमवारी रात्री हॅक झाले. तुर्कीच्या ‘टर्किश सायबर आर्मी’ अयिल्दिज टीमने बिग बी यांचे ट्विटर हॅण्डल हॅक केले होते. हॅकर्सनी त्यांच्या टि्वटर हॅण्डलचा प्रोफाईल फोटो बदलून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावला होता. सोबतच बायोमध्ये बदल करीत ‘लव्ह पाकिस्तान’ असे लिहिले. अमिताभ यांच्या टि्वटर अकाऊंटकरून तुर्की आणि पाकिस्तानशी संबंधित पोस्ट शेअर करण्यात आल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर अमिताभ यांचे टि्वटर हॅण्डल अर्ध्या तासात रिकव्हरही करण्यात आले.

हॅकर्सनी अमिताभ यांच्या हॅण्डलवरून ट्विट केले होते की, हा संपूर्ण जगासाठी एक महत्वपूर्ण संदेश आहे. आईसलॅण्ड रिपब्लिकने तुर्कीच्या फुटबॉल खेळाडूंना दिलेल्या वागणुकीचा आम्ही निषेध करतो. आम्ही प्रेमाने बोलतो, पण आमच्याकडे मोठी छडीही असते. मोठय़ा सायबर हल्ल्याबाबत तुम्हाला सांगत आहोत. अयिल्दिज टीम टर्किश सायबर आर्मी.

तुर्कीचा फुटबॉल संघ काही दिवसांपूर्वी यूरो 2020 चा क्कॉलिफाईंग सामना खेळण्यासाठी आईसलॅण्डला गेला होता. तिथे पोहोचल्यानंतर तुर्कीच्या खेळाडूंची विमानतळाकर कसून चौकशी करण्यात आली होती. त्याचाच निषेध अमिताभ बच्चन यांच्या टि्वटर हॅण्डलवरुन हॅकर्सनी केला होता.अमिताभ बच्चन यांनी आपल्या सायबर टीम आणि महाराष्ट्र सायबर टीमला याची माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

अदनान सामीचेही अकाऊंट हॅक
अमिताभ यांचे ट्विटर हँडल हॅक केल्यानंतर अयिल्दिज टीमने मंगळवारी गायक अदनान सामी याचेही ट्विटर अकाऊंट हॅक केले. सामीच्या प्रोफाईल फोटो जागी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा फोटो टाकण्यात आला. सोबतच त्याच्या बायोमध्ये बदल करीत ‘लव्ह पाकिस्तान’ असे लिहिण्यात आले. अदनान सामीकडे पूर्वी पाकिस्तानचा पासपोर्ट होता. त्याने 2015 पासून हिंदुस्थानचे नागरिकत्व घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या