‘ठाकरे’मधील भूमिकेसाठी अमृताला दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्कार

2

सामना प्रतिनिधी । मुंबई

चित्रपटसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘दादासाहेब फाळके एक्सलन्स’ पुरस्कार सोहळा शनिवारी सायंकाळी मुंबईत दिमाखात पार पडला. यावेळी ‘ठाकरे’ या चित्रपटात माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारणाऱया अभिनेत्री अमृता राव हिला मराठी चित्रपटातील पदार्पणासाठी ‘दादासाहेब फाळके एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

फाळके फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी ‘दादासाहेब फाळके एक्सलन्स’ पुरस्काराने कलाकारांना गौरविण्यात येते. यावेळी ‘धडक’ या सिनेमाद्वारे बॉलीवूडमध्ये डेब्यू करणाऱया जान्हवी कपूर आणि इशान खट्टरला पुरस्कार देण्यात आला. ‘हेलिकॉप्टर इला’ सिनेमासाठी काजोलला तर दाक्षिणात्य सिनेमांतील योगदानासाठी अदिती राव हैदरीला गौरविण्यात आले. टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती, ‘बधाई हो’साठी ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी, दिग्दर्शक अमित शर्मा यांनादेखील एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. रंगबाज आणि सेक्रेड गेम्ससाठी अनुक्रमे साकीब सलीम आणि कुब्रा सैत यांना ‘डिजिटल सेन्शेशन ऑफ दि इयर’ पुरस्कार दिला.

हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावे असलेला हा एक्सलन्स पुरस्कार मला मराठी चित्रपटातील सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. विवाहानंतर ‘ठाकरे’ या चित्रपटासाठी मला हा पुरस्कार मिळाला आहे. माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेसाठी माझी निवड केल्याबद्दल मी निर्माते संजय राऊत आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांचे मनापासून आभार मानते. असे अभिनेत्री अमृता राव यावेळी म्हणाल्या.