बोईसर रेल्वे स्थानकात बसण्याच्या जागेवरून प्रवाशांमध्ये राडा

सामना प्रतिनिधी । पालघर

स्लीपर कोचमध्ये पासधारक प्रवाशांनी घुसखोरी केल्याने आज सकाळी बोईसर स्थानकात प्रचंड राडा झाला. आधी पासधारकांना खाली उतरवा.. अन्यथा गाडी पुढे जाऊ देणार नाही.. अशा घोषणा देत आरक्षण केलेल्या प्रवाशांनी दोन तास भूज एक्सप्रेस रोखून धरली. यावेळी चेनची खेचाखेच आणि हाणामारीही झाल्याने एकच गोंधळ उडाला. अखेर रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पासधारक प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर ही एक्सप्रेस रवाना झाली. मात्र बसण्याच्या जागेवरून झालेल्या या वादामुळे पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

वांद्रय़ाच्या दिशेने जाणारी भूज एक्सप्रेस सकाळी पावणे दहाच्या सुमारास वापी स्थानकावर थांबली. यावेळी कामधंद्यानिमित्त जाणारे अनेक पास व तिकीटधारक नेहमीप्रमाणे स्लीपर कोचमध्ये चढले. यावेळी काही घुसखोरांनी थेट आरक्षित जागेवर ठाण मांडल्याने वादाला सुरुवात झाली. आम्ही आरक्षण करून प्रवास करतोय. तुम्ही जनरल डबा सोडून स्लीपर कोचमध्ये चढलातच कसे? असा सवाल भूज एक्सप्रेसमधील काही प्रवाशांनी वापी स्थानकात चढलेल्या पासधारकांना केला. यावेळी काही जणांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याने या कोचमधील प्रवाशांनी चेन खेचली. त्यामुळे ही गाडी बोईसर स्थानकाजवळ येऊन थांबली. आरक्षण केलेल्या प्रवाशांनी पासधारकांचा तीव्र विरोध करत तब्बल दोन तास भूज एक्सप्रेस रोखून धरल्याने वाहतुकीचा चांगलाच बट्टय़ाबोळ झाला.

लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा खोळंबा

बोईसर पोलीस, लोहमार्ग पोलीस तसेच जीआरपी यांनी पासधारक व जनरल प्रवाशांना उतरविल्यानंतर भूज एक्सप्रेस ११.४५ वाजता मुंबईकडे रवाना झाली. त्यामुळे मुंबई डहाणू उपनगरीय रेल्वेसेवा २ तास ठप्प होती. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा बोईसर स्थानकात खोळंबल्या होत्या.