शाहरुखच्या रेड चिलीजचा झाला ठेचा, दोन हजार चौरस फूट जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडले

सामना प्रतिनिधी, मुंबई

वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पालिकेला न जुमानणाऱ्या सुपरस्टार शाहरुख खानला पालिकेने चांगलाच दणका दिला आहे. गोरेगावातील ‘रेड चिलीज’ या शाहरुखच्या हॉटेलाचे तब्बल २००० चौ. फुटांवरील बांधकाम आज पालिकेने जमीनदोस्त केले. ‘रेड चिलीज’ प्रॉडक्शन हाऊसच्या अंतर्गत असलेल्या या हॉटेलचा शाहरुख हा डायरेक्टर असल्याचे समजते.

गोरेगाव पश्चिमेकडील विवेकानंद मार्गावरील डीएलएच पार्क या इमारतीतील चौथ्या मजल्यावर असणाऱ्या ‘रेड चिलीज’ या प्रॉडक्शन हाऊसमधील अनधिकृत बांधकाम आज पी उत्तर विभागाने धडक कारवाईदरम्यान तोडण्यात आले. या अनधिकृत बांधकाम केलेल्या भागात प्रॉडक्शन हाऊसमधील कर्मचाऱ्यांसाठी अनधिकृतपणे उपाहारगृह चालविले जात होते, अशी माहिती पी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांनी दिली आहे.

परिमंडळ-४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी दक्षिण विभागात अतिक्रमणे / अनधिकृत बांधकामे इत्यादींच्या विरोधात धडक कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई करण्यासाठी महापालिकेचे २५ कामगार–कर्मचारी -अधिकारी यांच्यासह पालिकेच्याच अतिक्रमण निर्मूलन कारवाईसाठी असणाऱ्या पोलीस पथकातील पोलीस कर्मचारीदेखील घटनास्थळी कार्यरत होते. ही कारवाई पार पाडण्यासाठी इमारत व कारखाने खात्याचे पदनिर्देशित अधिकारी सतीश नरवणकर व दुय्यम अभियंता अनिकेत बनकर यांनी विशेष परिश्रम घेतले.