मराठीत बोलायला सांगितल्याने कुरीयर बॉयचा दोघा बहिणींवर हल्ला

सामना प्रतिनिधी। मुंबई

मराठी बोलायला सांगितले म्हणून संतापलेल्या कुरीयर बॉयने वाद घालत दोघा बहिणींना जबर मारहाण केल्याची घटना आज सकाळी शिवाजी पार्क परिसरात घडली. पेनाने गालावर भोसकणाऱया त्या माथेफिरू कुरीयर बॉयला शिवाजी पार्क पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या.

शिवाजी पार्क पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या गुरुकृपा सोसायटीतील दहाव्या मजल्यावर पेडणेकर कुटुंबीय राहतात. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास एका कुरीयर बॉयने त्यांच्या घराची बेल वाजवली. सुजिता पेडणेकर (48) यांनी दरवाजा उघडल्यावर ‘फोरम कुरीयर’चा कुरीयर बॉय त्यांचे कुरीयर घेऊन आला होता. तो कुरीयर बॉय हिंदीत बोलत होता. त्यामुळे ‘तू मराठीत बोल’ असे सुजिता पेडणेकर म्हणाल्या तेव्हा ‘मी हिंदुस्थानचा नागरिक असून हिंदीतच बोलणार’ असे कुरीयर बॉय बोलू लागला. ‘तू आता महाराष्ट्रात असून तुला मराठीतच बोलावे लागेल’ असे सुजिता बोलल्यावर इब्राहिम शेख (28) हा कुरीयर बॉय त्यांना शिवराळ भाषा वापरून बोलू लागला. यामुळे दोघांमध्ये वाद झाल्यावर सुजिता यांची बहीण विनीता (50) तेथे आल्या. त्यांनी देखील इब्राहिमला खडसावले. त्यावेळी इब्राहिमने सुजिता यांचा हात मुरगळून त्यांच्या डोक्यात ठोसा मारला तर विनीता यांच्या गालावर पेनने भोसकले. हा गोंधळ सुरू असताना शेजारच्यांनी इब्राहिमला पकडून शिवाजी पार्क पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून शिवाजी पार्क पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, दहा दिवसांपूर्वीच इब्राहिम ‘फोरम कुरीयर’मध्ये कामाला लागला आहे. यापूर्वी तो विलेपार्ले येथील एका कुरीयर कंपनीत कामाला होता. आज सकाळी नेमका काय प्रकार घडला, नेमकी चूक कोणाची आहे याचा तपास केल्यानंतर चित्र स्पष्ट होईल असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.