छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा आज १३० वा वाढदिवस

90

सामना प्रतिनिधी । मुंबई

जगातील सर्वाधिक छायाचित्र घेतल्या जाणार्‍या मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या गॉथिक शैलीतील उत्कृष्ठ बांधकामाचा नमूना असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ऐतिहासिक इमारतीला रविवारी १३० वर्षे पूर्ण होत आहेत. युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ठ केलेल्या या देखण्या इमारतीत कायम स्वरूपी म्युझियम तयार करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. अनेक कामगार संघटनांचा मात्र त्यास विरोध आहे.

बोरीबंदर ते ठाणे अशा आशियातील पहिला रेल्वेचा प्रवास १६ एप्रिल १८५३ साली झाला. मात्र त्यासाठी जी कंपनी स्थापण करण्यात आली त्या ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीचे कार्यालय मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकर शेठ यांच्या घरात काही काळ होते. या कंपनीचे मुख्यालय बांधण्यासाठी स्थापत्य रचनाकार प्रâेडरीक विल्यम स्टीव्हन यांनी मे १८७८ मध्ये सुरूवात केली. २० मे १८८८ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. १६.१४ लाखात ही इमारत त्याकाळी बांधून पूर्ण झाली. लंडनची राणी व्हीक्टोरिया हिच्या ज्युबिली सेलिब्रेशननिमित्त इमारतीचे नाव १८८७ मध्ये व्हीक्टोरिया टर्मिनस ठेवण्यात आले. त्यानंतर १९९६ मध्ये या इमारतीचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ठेवण्यात आले.

इमारतीच्या तळ मजल्यावर या इमारती छोटेखाणी संग्रहालय असून अनेक परदेशी नागरीकांसह शाळकरी विद्यार्थी त्यास भेट देत असतात. ही इमारत पूर्व पश्चिम अशी बांधण्यात आली असून इंग्रजी आद्याक्षर ‘सी’ प्रमाणे तिचा आकार आहे. या इमारतीचा संपूर्ण भार मधल्या घुमटावर असून तिच्यावर प्रगतीची देवता म्हणून एका हातात चक्र तर दुसर्‍या हातात मशाल घेतलेल्या अशा प्रतिकृतीचा देखणा पूतळा असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.

अलिकडेच लांबपल्ल्यांच्या गाड्या थांबणार्‍या फलाट क्र. १८ च्या मागील प्रवेशद्वाराजवळ हेरिटेज गल्लीही स्थापण करण्यात आली असून तेथे पहिल्या इलेक्ट्रीक लोको इंजिनासह अनेक दुर्मिळ ठेवा जतन करण्यात आला आहे. पाण्याच्या वाफेवर चालणारी क्रेन, हाताने चालणारा अग्निशमन पंप, प्रिटींग मशिन आदी दुर्मिळ वस्तू पाहण्यासाठी ठेवल्याचे उदासी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या