मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव द्या!


सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईचे आद्य शिल्पकार, शिक्षणमहर्षी आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नामदार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्यावे यासाठी मुंबईतील तमाम नानाप्रेमी मंगळवारी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. यावेळी शेकडो दैवज्ञ बांधवही उपस्थित राहणार आहेत.

हिंदुस्थानात रेल्वेचा पाया घालणारे नामदार नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्यावे यासाठी अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद आणि नामदार नाना शंकरशेट प्रतिष्ठानच्या वतीने स्वाक्षरी मोहीम, पथनाटय़, मूक निदर्शने करून अनेकदा सरकारचे लक्ष वेधून घेण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसबाहेरही यासाठी आंदोलने करण्यात आली आहेत. शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, रेल्वेमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला आहे.

16 एप्रिल रोजी रेल्वे दिनाचे औचित्य साधून नाना शंकरशेठ स्मारक प्रतिष्ठान व दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या वतीने नाना चौक येथील नाना शंकरशेट यांच्या पुतळ्याला सकाळी 10 वाजता पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात येणार आहे. यावेळी नानाप्रेमींसह शेकडो दैवज्ञ बांधव उपस्थित राहणार आहेत. याच वेळी नामदार नानांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्यात यावे यासाठी जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत अशी माहिती नाना शंकरशेट स्मारक प्रतिष्ठानचे सरचिटणीस ऍड. मनमोहन चोणकर यांनी दिली. यावेळी दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे समाजश्रेष्ठ दिनकर बायकेरीकर, सुरेंद्र भाऊ शंकरशेट, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर यांच्यासह दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.