मुंबई जिल्हा गुणांकन कॅरम – संदीप देवरुखकर, संगीता चांदोरकर अजिंक्य

सामना क्रीडा प्रतिनिधी । मुंबई

द. बॉम्बे यंग मेन्स खिश्चन असोसिएशनने आयोजित केलेल्या मुथूट फायनान्स पुरस्कृत प्रतिष्ठेच्या सहाव्या मुंबई जिल्हा गुणांकन रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी, महिला एकेरी गटामध्ये अनुक्रमे ओ. एन. जी. सी.च्या बिनमानांकित संदीप देवरुखकर व माजी राज्य व राष्ट्रीय विजेती रिझर्व्ह बँकेच्या संगीता चांदोरकर यांनी विजेतेपदाला गवसणी घातली. ही प्रतिष्ठेची जिल्हा गुणांकन कॅरम स्पर्धा मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनच्या विद्यमाने व बॉम्बे वाय. एम.सी.ए.चे  जैसन सैम्युल, कार्याध्यक्ष, पिटर सेबॉस्टियन-प्रोग्राम कमिटी चेअरमेन,  पॉल जॉर्ज-सरचिटणीस आणि भास्कर कुमार-चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नीट आणि नेटक्या पद्धतीने आयोजित करण्यात आली.

पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीच्या एक तास व दोन गेम रंगलेल्या एकतर्फी सामन्यात ओ. एन. जी. सी.च्या संदीप देवरुखकरने चौथा मानांकित जागतिक व विश्व विजेता रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेचा 25-11, 25-0 असा फडशा पाडत विजेतेपद पटकावले. महिला एकेरी गटाच्या अंतिम फेरीच्या तीन तास रंगलेल्या सामन्यात रिझर्व्ह बँकेच्या माजी राज्य व राष्ट्रीय विजेत्या संगीता चांदोरकरने सी. डी. ए. नेव्हीच्या दुसऱया मानांकित प्रीती खेडेकरची कडवी झुंज 25-19, 11-25, 25-16 अशी मोडीत काढून विजेतेपदावर नाव कोरले.

रंगतदार बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमात विजेत्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे मुथूट फायनान्सचे क्षेत्रिय प्रबंधक प्रताप मोहंती, आयसक प्रसादम्-असोसिएट जनरल सेप्रेटरी, वाय.एम. सी. ए. यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषकाने गौरविण्यात आले.