अकरावीच्या पुस्तकांना जुलै उजाडणार

25

सामना प्रतिनिधी। मुंबई

येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2019-20 मध्ये इयत्ता दुसरी आणि अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. दुसरीची सर्व माध्यमांची पाठय़पुस्तके बाजारात उपलब्ध झाली असून अकरावीची पुस्तके मात्र अद्याप बाजारात आली नाहीत. ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती यायला जुलै महिना उजाडण्याची शक्यता आहे.

सीबीएसईच्या धर्तीवर 2013 पासून अभ्यासक्रमात बदल करण्यास सुरुवात झाली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेनंतर अकरावीचे वर्ग सुरू होण्यास ऑगस्ट महिना उजाडतो. त्यामुळे सध्या तरी अकरावीच्या पाठय़पुस्तकांची विद्यार्थ्यांना घाई नाही. मात्र अद्यापही अकरावीच्या पाठय़पुस्तकांचे काम पूर्ण झालेले नाही.

आर्ट्स, कॉमर्सपेक्षा सायन्सच्या विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकांची प्रतीक्षा आहे. नीट, जेईईची तयारी करणाऱया विद्यार्थ्यांचे क्लासेस सुरू झाले असून त्यांना प्रतीक्षा पुस्तकांची आहे. पण आणखी काही दिवस तरी या विद्यार्थ्यांसमोर पुस्तकांची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.

अकरावीचे वर्ग जसे सुरू होतील तशी पाठय़पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. पण अकरावीचे वर्गच जुलै-ऑगस्टमध्ये सुरू होतात. जी कॉलेज लवकर सुरू होतील त्यांच्यासाठी आधी पाठय़पुस्तके दिली जातील. दुसरीच्या पाठय़पुस्तक निर्मितीचे काम पूर्ण झाले असून टप्प्याटप्याने ती पुस्तकेही बाजारात उपलब्ध होत आहेत. असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे संचालक, सुनील मगर यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या