हाऊसफुल्ल- थरारक डॉक्यु-ड्रामा ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’

575

वैष्णवी कानविंदे-पिंगे । मुंबई

सत्य घटना आणि तीदेखील आपल्या देशातल्या शूरवीरांची. मसाला बॉलीवूडच्या सिनेमांसाठी नेहमीच हमखास चवीचा ठरला आहे. असे सिनेमे प्रेक्षकांच्या मनातलं देशप्रेम, मसालेदार चांगल्या सिनेमाची आवड या दोन्ही गोष्टींना पूरक ठरतात. नुकताच प्रदर्शित झालेला ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ हा सिनेमा पठडीतला आहे. पण सत्य घटना आणि करमणूक याचा समतोल साधताना त्यात घटनेला वजन जास्त मिळाल्यामुळे सिनेमा डॉक्युमेंटरीच्या दिशेने अधिक झुकला गेलाय.

हा सिनेमा घडलेल्या घटनेवर आधारित आहे. देशभरात जेव्हा बॉम्बस्फोट होत होते तेव्हा यासिन भटकळ हे नाव खूप खूप दहशत निर्माण करत होतं. यासिन भटकळला पकडण्यासाठी हिंदुस्थानची इंटेलिजन्स टीम ज्या पद्धतीने मिशन आखते आणि इंडियाज मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला पकडून देते त्याचीच गोष्ट म्हणजे ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ हा सिनेमा.

या सिनेमाचा विषय खरोखरच चांगला आहे. दहशतवाद विशेष करून राहत्या शहरांमध्ये दहशतवाद्यांनी घडवलेले आणि त्यांच्या आठवणी आजही आपल्याला थरारून सोडतात. त्यामुळे अशा प्रकारचा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच जिवंत अनुभव देणारा ठरतो.

हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. पण सिनेमा जेव्हा सत्य घटनेवरचा असतो त्यावेळी रंजकता आणि घटना या दोघांमधली सूक्ष्म रेषा ओळखून तो बेमालूमपणे मिसळता आला पाहिजे, तरच सिनेमा म्हणून प्रत्येक प्रेक्षकाला आवडू शकतो. पण हा सिनेमा बॉलीवूड पटापेक्षा सिमेंट डॉक्युमेंटरी वर्गात अधिक चांगला बसू शकतो असं सिनेमा पाहताना वाटतं.

ज्या वेळेला गुन्हेगारी आणि त्याच्याभोवती गुंतलेलं नाटय़ अशा पद्धतीचा सिनेमा असतो, त्यामध्ये सगळय़ात महत्त्वाची भूमिका असते ती पटकथेची. अर्थात संवादही महत्त्वाचे असतातच, पण बांधलेली पटकथा आणि त्याला नेमकेपणाने मिळालेली दिग्दर्शनाची साथ हे समीकरण असेल तर तशा पद्धतीचा सिनेमा नक्की यशस्वी होतो. राझी, रेड, स्पेशल छब्बिस, बेबी… अशा पद्धतीच्या अनेक सिनेमांनी प्रेक्षक म्हणून आपल्याला खूश केलं होतं. ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’कडूनही तशाच अपेक्षा होत्या. पण दुर्दैवाने या सिनेमाने पटकथेत मार खाल्ल्यामुळे सिनेमा म्हणावा तसा प्रेक्षकाला बांधू शकत नाही.
यात कलाकार तसे बरे आहेत, पण मुख्य भूमिकेत अर्जुन कपूर तितकासा प्रभाव पाडू शकत नाही. कदाचित अजय देवगन, अक्षयकुमार, रणवीर सिंगसारखा अभिनेता या सिनेमाला अधिक न्याय देऊ शकला असता.

सिनेमाची लांबी कमी आहे ही बरी गोष्ट आहे. पण सिनेमात काही उत्कंठावर्धक गोष्टी घडतील असं वाटत असतानाच सिनेमा कधी संपतो हे कळतदेखील नाही. मुळात अशा सिनेमांमध्ये जरी सत्य घटना असली तरीही आपल्या प्रेक्षकाला हीरोने काहीतरी हीरोगिरी दाखवावी अशी अपेक्षा असते. साधी सरळ म्हणलेली गोष्ट प्रभाव पडत नाही आणि या सिनेमात नेमकं तेच घडतं.

दृश्यांच्या पार्श्वभूमीवर असणारी गाणी, त्रिवेदीसारखा संगीतकार असूनही फार प्रभावशाली ठरत नाही. छायांकन ठिकठाक आहे.

यासिन भटकळला पकडायची ही मिशन अतिशय गुप्त असते. पण अनेकदा ही मिशन गुप्त आहे याचा इतक्यांदा उल्लेख होतो खरोखरच ती गुप्त आहे का, असं वाटावं. पाच जणांची टीम असते, पण मुख्य अर्जुन कपूर वगळता इतर चौघांच्या व्यक्तिरेखेवर इतकी मेहनत घेतलेली दिसत नाही.

सिनेमा उघडतो तेव्हा पुणे येथे झालेला बॉम्बस्फोट पडद्यावर दिसतो. ते दृश्य खरोखरच प्रभावशाली चित्रित झाले आहे. ते पाहताना भीती वाटते. जशी जशी मिशन पुढे सरकते तसा तसा प्रभाव निष्प्रभ व्हायला लागतो. लाल फितीचा कारभार आणि अन्य गोष्टी बांधल्या गेल्या पाहिजे होत्या.

जर देशप्रेमाचे, आपल्या शूरवीर ऑफिसर किंवा सैन्याचे घडलेले किस्से पडद्यावर पाहायला आवडत असतील तर हा सिनेमा अपेक्षापूर्ती करायला थोडा कमी पडलाय असं वाटू शकतं. तरीही एक महत्त्वाची सत्य घटना जाणून घेण्यासाठी हा सिनेमा एकदा पाहायला काही हरकत नाही.

दर्जा

सिनेमा इंडियाज मोस्ट वॉन्टेड
निर्माता फॉक्स स्टार स्टुडिओ, राज कुमार गुप्ता, मायरा करण
लेखक/दिग्दर्शक राज कुमार गुप्ता
संगीत अमित त्रिवेदी
कलाकार अर्जुन कपूर, अमृता पुरी,
राजेश शर्मा, प्रशांत अलेक्झांडर, देवेंद्र मिश्रा, गौरव मिश्रा

आपली प्रतिक्रिया द्या