मुंबईतील ४२ एकर मोकळी जागा वाढवली

सामना प्रतिनिधी । नागपूर

मुंबईच्या विकास आराखडय़ात ४२ एकर मोकळी जागा वाढवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईच्या विकास आराखडय़ाबाबत महापालिका आणि शासनस्तरावर बारकाईने विचार करण्यात आला असून एकमताने पाठवलेला विकास आराखडा शासनाने १४ ठिकाणी बदलला आहे. त्यानुसार मुंबईतील सुमारे ४२ एकर मोकळी जागा वाढवल्याची माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, मुंबईचा विकास आराखडा इंग्रजी भाषेत तयार झाला असला तरी त्याचा अनुवाद मराठी भाषेत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईचा विकास आराखडा मराठीत करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलन केले होते. शिवसेनेच्या मागणीला यश आले असून अखेर मुंबईचा विकास आराखडा मराठीत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांना करावी लागली. विकास आराखडय़ात बदल करण्याची शिवसेनेची मागणीही मान्य झाली आहे. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, या आराखडय़ामधील प्रस्तावित कामे बदलावयाची असल्यास राज्य शासनाची मंजुरी घ्यावी लागत होती, मात्र विकास आराखडय़ातील कामे जलदगतीने होण्यासाठी बदल मंजुरीचे अधिकार आयुक्तांना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या कामात सुसूत्रता यावी यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा विचार शासन करीत आहे. हा आराखडा इंग्रजीत तयार झाला असला तरी त्याचा अनुवाद मराठीत करण्यात आल्याचे ते म्हणाले.

– म्हाडामधील भाडेकरूंचा प्रश्न भाडेकरूंच्या सोसायटीला पुनर्विकासासाठी परवानगी देऊन करण्यात येईल. घरांची समस्या सोडविण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजनें’तर्गत पाच लाख घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लोणावळा येथील खासगी जमिनीवर पोलिसांच्या घरासाठीच्या जमिनीचे आरक्षण दाखविण्यात आले आहे. हा प्रश्नही सामोपचाराने सोडविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.