विदर्भात उष्णतेची लाट, मुंबईचा पारा 34 वर, पण चटके कायम

2

सामना प्रतिनिधी। मुंबई

विदर्भ मराठवाडय़ात उष्णतेची लाट असून दुष्काळाच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत. आधीच खपाटीला गेलेल्या विहिरी, नद्या, धरणे पूर्णपणे सुकून गेली आहेत. त्यामुळे अनेक भागात दूषित पाणी प्यावे लागत असून आजारपणाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्याचे चित्र आहे. मंबईचा पारा मंगळवारी 34 डीग्री नोंदवला गेला. पण, चटके कायम होते.

राजस्थान, मध्य प्रदेशात तसेच उत्तर पाकिस्तानात सायक्लॉनिक सक्युलेशन म्हणजेच प्रतिचक्रवाती सिस्टीम निर्माण झाल्याने तेथून येणाऱया उष्ण वाऱयांनी मुंबईसह मराठवाडा आणि विदर्भ तापला आहे. उन्हाळा सुरू झाला असून उन्हाची तीव्रता आणखी वाढत जाईल. विदर्भ आणि मराठवाडय़ात उष्णतेची लाट कायम राहील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

रायगडातही पारा चढला, तरीही मतदानाचा उत्साह

ठाणे, रायगडात 40 डीग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. तरीही मतदारांचा उत्साह प्रचंड होता. कडक उन्हातही मतदार घराबाहेर पडले. याठिकाणी हवामान दमट नव्हते. त्यामुळे उन्हाचे चटके बसत होते. पुढचे काही दिवस पारा चढता राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

अवकाळी पाऊस, गारवा आणि सूर्याचा प्रकोप

गेल्या आठवडय़ात अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागपूरसह विदर्भातील जनतेला थोडा दिलासा मिळाला होता. सोमवारपासून सूर्यदेवतेने आपला प्रकोप दाखवणे सुरू केले आहे. मंगळवारी सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे 45.1 अंश सोल्सिअस अशी नोंदविण्यात आली आहे. विदर्भात पारा 40 च्या वर गेल्यामुळे परत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

शहर पारा
वर्धा 43.8
चंद्रपूर 43.4,
अकोला 43.4
नागपूर 42.5
अमरावती 42.6
गडचिरोली 42.2
गोंदिया 41
वाशिम 41.2
यवतमाळ 42
बुलडाणा 40.6