शनिवारीही कामकाज; सरन्यायाधीशांच्या विनंतीकडे मुंबई उच्च न्यायालयाचा काणाडोळा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

१० वर्ष किंवा त्यापेक्षाही जुन्या गुन्ह्यांसंदर्भातील खटले वेगाने निकाली काढण्यासाठी देशाच्या सरन्यायाधीशांनी सगळ्या उच्च न्यायालयांना शनिवारीही काम करण्याची विनंती केली होती. ही विनंती मुंबई उच्च न्यायालय वगळता इतर सगळ्या न्यायालयांनी अंमलात आणली आहे, किंवा आणायला सुरुवात केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मात्र या विनंतीकडे सध्यातरी काणाडोळा केल्याचं बघायला मिळतंय. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी ४ सप्टेंबरला सगळ्या उच्च न्यायालयांना शनिवारी कामकाज सुरू ठेवण्याबाबत पत्र लिहलं होतं, यानंतर देशातील २४ पैकी १९ न्यायालयांनी शनिवारीही कामकाज करायला सुरुवात केली, मात्र ३ महिने झाले तर मुंबई उच्च न्यायालयाने एकदाही शनिवारी काम केलेलं नाहीये.

२६ डिसेंबरला पुन्हा एकदा सरन्यायाधीशांनी शनिवारी कामकाज सुरू ठेवण्याची सर्व उच्च न्यायालयांना विनंती केली आहे, या विनंतीनंतर तरी मुंबई उच्च न्यायालय शनिवारी कामकाज सुरू ठेवते काय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान सरन्यायाधीशांच्या विनंतीला मान देत शनिवारीही कामकाज सुरू ठेवत सगळ्यात जास्त खटले निकाली काढणाऱ्या उच्च न्यायालयांमध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा पहिला क्रमांक लागला आहे. ३ महिन्यात शनिवारी केलेल्या कामकाजादरम्यान इथे ३२१ खटले निकाली काढण्यात आले. छत्तीसगड उच्च न्यायालयाने १८६ खटले निकाली काढत या यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे तर १७७ खटले निकाली काढत पाटणा उच्च न्यायालय तिसऱ्या स्थानी आहे. कोलकाता, मद्रास आणि केरळमधील उच्च न्यायालयाने प्रत्येकी एका शनिवारी काम केलं आहे तर दिल्ली उच्च न्यायालयाने आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे ७ शनिवारी काम केलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.