हायड्रॉलिक पार्किंगने घेतला चिमुकल्याचा जीव

52

सामना प्रतिनिधी । मुंबई

हायड्रॉलिक पार्किंगचा रॅम्प तुटल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत सहा वर्षांच्या मुलाला जीव गमवावा लागल्याची घटना कांदिवलीच्या महावीर नगर येथे बुधवारी घडली. निहाल वासवानी असे मृत मुलाचे नाव आहे. निहाल हा वासवानी यांचा एकुलता एक मुलगा आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

शहरात जागेची अडचण पाहता काही सोसायटय़ांनी हायड्रॉलिक पार्किंग सुरू केली. कांदिवलीच्या महावीर नगर येथे ‘वीणा संतूर’ नावाची सोसायटी आहे. त्या सोसायटीत हायड्रॉलिक पार्किंगद्वारे वाहने पार्क केली जातात. बुधवारी सकाळी निहालसह काही मुले सोसायटीत खेळत होती. काही मुले ही हायड्रॉलिक पार्किंगच्या खालून पळत होती. अकरा वाजताच्या सुमारास सोसायटीचा सुरक्षा रक्षक हा एक धुतलेली गाडी पार्क करत होता. त्याच दरम्यान पार्किंगचा रॅम्प तुटला व त्यात निहाल जखमी झाला. अवजड रॅम्पच्या खाली दबला गेलेल्या निहालला त्याच्या वडिलांनी उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले परंतु तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आणखी एका मुलाच्या खांद्याला इजा झाली आहे.

या घटनेची माहिती कळताच कांदिवली पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तांत्रिक बाबीदेखील पोलीस तपासणार आहेत. त्यावरून नेमका अपघात कसा आणि कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.

कांदिवली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. अकरा महिन्यांपूर्वी एच आणि आय विंगला पझेशन देण्यात आले होते. पोलिसांनी योग्य तपास करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सोसायटीमधील रहिवाशांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या