दोन महिने होत आले तरी पुनर्बांधणी नाही, खैरानी रोडवरील पूल लटकला

105

सामना प्रतिनिधी । मुंबई

साकीनाका- खैरानी रोड-हरी मस्जिद येथील नाल्यावरील पूल तोडून दोन महिने होत आले तरी तेथे अद्याप पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पालिका प्रशासनाने सुरू केलेले नाही. हा पूल तोडल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तर तेथील अवस्था आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे नव्याने पूल उभारणीच्या कामासाठी पालिका प्रशासनाला मुहूर्त कधी सापडणार असा सवाल नागरिक करीत आहेत.

पालिका प्रशासनाने 23 मार्च रोजी खैरानी रोडवरील नाल्यावरचा धोकादायक बनलेला पूल जमीनदोस्त केला. पालिकेने लगबगीने पूल तोडला पण त्याच लगबगीने पुनर्बांधणीचे काम सुरू न केल्याने तेथील परिस्थिती बिघडून गेली आहे. पूल तोडून आता दोन महिने होत आले तरी पूल पुनर्बांधणीची कोणतीच हालचाल तेथे दिसत नाही. नाल्यावर पूल नसल्याने काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी आमची अवस्था झाली आहे. पूल तोडल्याच्या ठिकाणी पत्रे उभे केले असून बांबूची परांची बांधण्यात आली, मात्र तरी एका बाजूने दुचाकीवाले तेथून ये-जा करण्याचा प्रयत्न करतात. पावसाआधी नाल्यावरील पुलाची पुनर्बांधणी झाली नाही तर तेथील अवस्था आणखी कठीण होऊन जाईल. खैरानी रोड हा असल्फा व साकीविहार रोड यांना जोडणारा मध्य वस्तीतील प्रमुख रस्ता असून तो पुलाविना बंद पडल्याने तेथील नागरिक तसेच चाकरमानी प्रचंड हैराण झाले आहेत.

पूल लवकर बांधा
पावसाळा तोंडावर आला आहे. त्यात पुलाचे ठिकाण नाल्यावर असल्याने पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी. वेळीच पुलाची पुनर्बांधणी झाली नाही तर पावसाळ्यात सगळेच कठीण होऊन बसेल. आजूबाजूच्या परिसरातील लहान मुले, महिला, विद्यार्थी तेथून ये-जा करतात. त्यामुळे तेथे दुर्घटना घडण्याची भीती आहे. तेव्हा लवकरात लवकर पुलाचे बांधकाम सुरू करावे असे नागरिकांचे म्हणणे असून वाहतूक पोलिसांनी देखील पालिकेच्या पूल विभागाला पत्र लिहून पुलाच्या पुनर्बांधणीचे काम तत्काळ सुरू करावे असे आवाहन केले आहे.

वाहतुकीचा होतो खोळंबा
खैरानी रोडवरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी असल्फा, साकीविहार रोडवर वाहतुकीचा खोळंबा होतो. कामाला जाताना किंवा कामातून घरी परतताना ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागत असल्याने चाकरमान्यांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. पाच मिनिटांच्या प्रवासासाठी फिरून ये-जा करावी लागत असल्याने सर्वांचीच गैरसोय होत आहे. वाहतूककोंडी होत असल्यामुळे वाहतूक पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या