कार्यालयांचे वेळापत्रक

>>वैभव मोहन पाटील<<

मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये आज चारही मध्य, पश्चिम, हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची गर्दी पाहिली तर आपण कुठल्या तरी बजबजपुरीमध्ये राहत असल्याचा भास होतो. दिवसेंदिवस वाढत असलेली ही गर्दी येते कुठून? हा प्रश्न कायम पडतो. सकाळच्या वेळी अगदी दुपारी बारा साडेबारापर्यंत सर्वच लोकल प्रवाशांनी अगदी खचाखच भरून वाहत असल्याचे दिसून येते. हार्बर, मध्य व पश्चिम रेल्वेमार्गावर सकाळी मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱया नोकरदारांची भरमसाट गर्दी असते. नोकरीनिमित्त हे प्रवासी मुंबईकडे सकाळी प्रवास करतात तर सायंकाळी घराकडे परतण्यासाठी. या प्रवाशांमध्ये मुख्यत्वे शासकीय कर्मचारी, बँकांमधील कर्मचारी व इतर खासगी आस्थापनांवर काम करणाऱया कर्मचाऱयांचा समावेश होतो. ही सर्व कार्यालये सकाळी एकाच वेळेला सुरू होतात व सायंकाळी थोडय़ाफार फरकाने बंद होतात. ही सर्व काम करणारी मंडळी मध्यमवर्गीय आहेत. त्यामुळे या सर्व गर्दीचा ताण स्वस्त व जलद प्रवास म्हणून रेल्वेमार्गावर पडतो व सकाळ, संध्याकाळच्या वेळेस या लोकल गर्दीने ओसंडून वाहत असतात. याच गर्दीमुळे अनेक रेल्वे अपघात तर घडतातच, पण याच गर्दीत चोर, पाकीटमार, समाजविघातक घटक आपला कार्यभार साधत असतात. त्यामुळे लोकलमधील ही गर्दी कमी करायची असेल तर मुंबईमधील कार्यालये व बँकांचे कामाचे वेळापत्रक बदलणे गरजेचे आहे, जेणेकरून विविध वेळांमध्ये काम करणारे कर्मचारी वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या लोकल गाडय़ांमधून प्रवास करतील व साहजिकच लोकलमधील जीवघेणी गर्दी कमी होण्यास यामुळे मदत होईल. लोकल गाडय़ांमधील वाढत्या गर्दीला आवर घालण्यासाठी भविष्यकालीन संकटाचा वेध घेणारा सध्या तरी हा एकच पर्याय मुंबईकरांसमोर आहे. राज्याच्या कानाकोपऱयातून तसेच विविध प्रांतांमधून नोकरीधंद्यानिमित्त मुंबईत येणाऱया व इथेच स्थायिक होणाऱया लोकांची वाढती संख्या रेल्वेमार्गांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. या गर्दीवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने विविध सोयिस्कर मार्ग रेल्वे प्रशासनाला अमलात आणावेच लागतील. कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा प्रयोग एकदा करून पाहायला काय हरकत आहे? शासनाने या पर्यायावर आता गांभीर्याने विचार करायला हवा.