ऑनलाइन फसवणूक करणाऱया तरुणाला अटक

59

सामना प्रतिनिधी। मुंबई

ऑनलाइन फसवणुकीतल्या पैशातून महागडे मोबाईल खरेदी करून ते राजस्थानमध्ये विक्री करणाऱया तरुणाला कफ परेड पोलिसांनी अटक केली. राज पुरोहित असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 166 मोबाईल जप्त केले आहेत.

तक्रारदार या कफ परेड परिसरात राहतात. त्यांना काही महिन्यांपूर्वी राजने फोन करून आपण एका सरकारी बँकेच्या बीकेसी येथील शाखेतून बोलतोय असे तक्रारदार महिलेला भासवले. पुरोहितने महिलेच्या बँक खात्याची माहिती घेतली व तिची 90 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.

फसवणूकप्रकरणी कफ परेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ निरीक्षक रश्मी जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, संदीप पिसे यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीचा अभ्यास केला. त्यावरून पोलिसांनी पुरोहितला बिकानेर येथून ताब्यात घेऊन पुढील चौकशीकरिता मुंबईत आणले. पोलिसांनी त्याच्याकडून 166 मोबाईल जप्त केले होते. अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

10 टक्के मिळायचे कमिशन
पुरोहित हा फसवणुकीच्या रकमेतून मुंबईतल्या मोठय़ा मॉल्समधून महागडे फोन खरेदी करायचा. मॉल्समधून खरेदी केलेले मोबाईल तो राजस्थानच्या बिकानेर येथे जाऊन विकत असायचा. त्याला 10 टक्के कमिशन मिळत असायचे. तसेच मोबाईल विक्रीमधून मिळणारे काही पैसे तो स्वतःकडे ठेवत असायचा, तर काही पैसे एकाला देत असायचा.

आपली प्रतिक्रिया द्या