मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे

सामना प्रतिनिधी । मुंबई

किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून ग्रंथसंग्रहालयाच्या इमारतीसमोर उपोषणाला बसले होते. अखेर शुक्रवारी मध्यरात्री काही मागण्या मान्य झाल्यानंतर कर्मचाऱयांनी उपोषण मागे घेतले. दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे पाच कर्मचारी उपोषणाला बसले होते. किमान वेतन, रखडलेल्या बढत्या-बदल्या अशा कर्मचाऱयांच्या मागण्या होत्या.

शुक्रवारी उपोषणकर्त्यांपैकी राजश्री नाईक आणि शशिकांत पवार यांची प्रकृती ढासळली. अखेर सूडबुद्धीने केलेली बदली रद्द केली जाईल असे आश्वासन ग्रंथालय प्रशासनाकडून मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घेतले. उर्वरित मागण्यांवर आठ दिवसांत निर्णय घेऊ, असेही ग्रंथालय प्रशासनाने सांगितले. मात्र मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे.