महाराष्ट्राचा अचूक निशाणा, मुंबई महापौर चषक तिरंदाजी स्पर्धेत बोलबाला

2

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई महापौर चषक तिरंदाजीच्या अखिल हिंदुस्थानी स्पर्धेत महाराष्ट्राने धम्माल उडवली. तब्बल २०० खेळाडूंचा सहभाग असलेल्या या तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी १२२ पदकांवर निशाणा साधला तर जिल्हास्तरीय स्पर्धेत गोरेगावच्या प्रबोधन तिरंदाजी केंद्राने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांनी १५ सुवर्णांसह ३१ पदकांचा वेध घेतला तर दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या पोयसर जिमखान्याने ११ सुवर्णांसह २१ पदके जिंकली.

अंधेरीच्या शहाजी राजे क्रीडा संकुलात पार पडलेल्या मुंबई महापौर तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राचाच बोलबाला दिसला. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई तिरंदाजी संघटनेच्या माध्यमातून झालेल्या स्पर्धेत १०, १४, १७ आणि १९ वर्षांखालील तसेच वरिष्ठ आणि वयस्कर अशा एकंदर सहा गटांसाठी खेळाडूंमध्ये लढती झाल्या. स्पर्धेत महाराष्ट्रासह हरयाणा, दिल्ली, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि जम्मू-कश्मीर या राज्यातील खेळाडूंचा मोठ्या संख्येने सहभाग होता. स्पर्धेत सहा गट होते आणि प्रत्येक गटात फक्त महाराष्ट्राचेच वर्चस्व दिसत होते. अनेक गट असे होते ज्यात फक्त महाराष्ट्राचेच खेळाडू पदक विजेते ठरले. महाराष्ट्राच्या खालोखाल हरयाणा आणि तामीळनाडूच्या खेळाडूंनी बाजी मारली.