मोनोरेलला लागलेल्या आगीची चौकशी होणार

सामना ऑनलाईन । मुंबई

म्हैसूर कॉलनी स्टेशन जवळ मोनोरेलच्या मागच्या दोन डब्यांना आग लागली. शुक्रवारी पहाटे स्थानकावर मोनोरेल उभी असताना ही घटना घडल्याने जीवितहानी झाली नाही, मात्र मोनोरेलची सेवा ठप्प झाली. प्रवाशांचे हाल झाले. या प्रकरणी एमएमआरडीएने एक चौकशी समिती नेमली आहे.

रेल्वेच्या (पश्चिम विभाग) सुरक्षा विभागाच्या आयुक्तपदावरुन निवृत्त झालेल्या पी. एस. बघेल यांच्या अध्यक्षतेखालील समिती मोनोरेलला लागलेल्या आगीची चौकशी करेल, असे एमएमआरडीएने सांगितले. शुक्रवारी पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी म्हैसूर कॉलनी स्टेशन जवळ मोनोरेल उभी असताना गाडीच्या मागच्या डब्याला आग लागली. थोड्याच वेळात आग पसरली आणि दुसऱ्या डब्यानेही पेट घेतला. अल्पावधीत मोनोरेलच्या दोन डब्यांचे प्रचंड नुकसान झाले. अग्निशमन दलाने ४० मिनिटांत आग विझवली. आगीत जीवितहानी झाली नाही तसेच कोणीही जखमी झाले नाही.