महापालिकेकडून बेस्टला दरमहा 100 कोटी देण्याचा करार मंजूर

15

सामना प्रतिनिधी। मुंबई

आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला महानगरपालिकेकडून दरमहा 100 कोटी रुपये देण्याबाबतचा सामंजस्य करार मंगळवारी सहमताने मंजूर झाला. भाडेतत्त्वावरील बससेवांचा प्रश्नही तडजोडीने निकालात काढला गेला. त्यासाठी 440 नव्या बसेसची खरेदीही लवकरच केली जाणार आहे. या बसेसचा चालक हा खासगी आणि वाहक हा बेस्टचा असणार आहे. बेस्ट कर्मचाऱयांना संरक्षण, बसताफ्यात कपात न करणे, निवृत्त कर्मचाऱयांची थकीत देणी तातडीने देणे आदी मागण्याही बेस्ट प्रशासनाने मान्य केल्या आहेत.

या करारासाठी पालिका प्रशासन, बेस्ट समिती आणि युनियनचे नेते मंगळवारी बेस्ट भवन येथे एकत्र आले होते. मुंबई महापालिकेने बेस्ट वाचविण्यासाठी केलेल्या शिफारशींमुळे कामगार संतुष्ट झाल्याने बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने या कराराला पाठिंबा दिला. एप्रिल 2007 पासून भरती झालेल्या कामगारांना 10 टप्प्यातील वाढ मे महिन्यात पगारात देणे, कामगार करारासाठी वाटाघाटींना लवकरच सुरुवात, बेस्ट उपक्रमास झालेला तोटा पालिका भरून देणार आदी 10 मागण्या बेस्ट कृती समितीच्या बैठकीत मांडण्यात आल्या. बेस्टचा स्वमालकीचा 3,337 बसताफा आणि कर्मचारी कायम राहणार, नव्याने बसखरेदीसाठी पालिका खर्च देणार, निवृत्त कर्मचाऱयांची थकीत देणी सप्टेंबरपर्यंत दिली जातील, जानेवारी संपातील कर्मचाऱयांवर शिस्तभंगाची कारवाई होणार नाही आणि हा सामंजस्य करार पालिकेस मान्य असल्याचे आयुक्तांचे लिखित पत्र अशा 10 मुद्दय़ांचा त्यात समावेश आहे.

बेस्ट कर्मचाऱयांच्या मागण्या पालिकेने मान्य केल्याने कर्मचाऱयांनी विरोध मागे घेतला आहे. वाढीव पगार, वेतनकरार, थकीत देणी, कर्मचाऱयांना संरक्षण, बेस्टच्या मालकीतील बसताफ्यांची संख्या कायम राहणे अशा सर्व गोष्टी संमत झाल्या आहेत. त्यामुळे बेस्ट उपक्रमासह मुंबईकरांचेही हित साधले जाणार असल्याची प्रतिक्रिया कृती समितीचे पदाधिकारी शशांक राव यांनी दिली. यासंदर्भात समितीतर्फे परळ येथे कर्मचाऱयांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

‘बेस्ट’चे नवीन दहा हजार ग्राहक
परिवहन विभाग तोटय़ात असला तरी बेस्टच्या वीज ग्राहकांमध्ये मात्र वाढ झाली आहे. जानेवारी ते मार्च 2019 मध्ये दहा हजार नवीन ग्राहक वाढले असल्याची माहिती बेस्ट समिती बैठकीत देण्यात आली. मुंबईत टाटाकडून वीजपुरवठा करण्यात येत असला तरी बेस्टचेही 10 लाख 37 हजार ग्राहक आहेत. ग्राहक वाढले तरी वीजचोरीला आळा बसलेला नाही. शिवाय अद्यापही 53 कोटींची थकबाकी वसूल झालेली नसल्याची बाबही उघड झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या