मुंबई महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा, देशात सर्वोत्तम!

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘स्वच्छता सर्वेक्षणात’ मुंबई महानगरपालिका देशात सर्वोत्तम ठरली आहे. कचरा संकलन, विल्हेवाट, खतनिर्मिती, जनजागृती आणि लोकसहभाग अशा स्वच्छतेच्या सर्व कसोट्यांमध्ये मुंबईला पहिले स्थान मिळाले आहे. यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. देशभरातील राजधान्यांमध्ये घेण्यात आलेल्या ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’चे निकाल आज जाहीर करण्यात आले..

‘स्वच्छ मुंबई’साठी नागरिकांनी केलेले सक्रीय सहकार्य आणि पालिकेचे सफाई कामगार, कर्मचारी, अधिकारी, स्वयंसेवी संस्थांनी रात्रंदिवस केलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया या यशानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी व्यक्त करताना सर्वांचे कौतुकही केले. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषांनुसार पालिका क्षेत्रात स्वच्छता अभियनाच्या अनुषंगाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे हे यश मिळाले. २०१५ मध्ये महापालिका क्षेत्रातून दररोज ९ हजार ५०० मेट्रीक टन एवढ्या प्रमाणात कचरा संकलित करण्यात येत होता. याबाबत महापालिकेने राबविलेल्या उपाययोजना व नागरिकांचे मिळालेले सक्रीय सहकार्य यामुळे कचर्‍याचे हे प्रमाण आता दररोज ७ हजार १०० मेट्रीक टनांपर्यंत खाली आले आहे. यासाठी पालिकेने कचरा वर्गीकरण, कचर्‍यापासून खतनिर्मिती, जनजागृती, प्रदर्शने यासारखे उपक्रम राबवले.

या कसोट्यांवर झाली निवड
> महापालिका क्षेत्रातील कचरा संकलनाबाबत घरोघरी (हाऊस टू हाऊस कलेक्शन) जाऊन कचरा संकलन करण्यावर भर देण्यात आला. यानुसार पूर्वी ३ हजार ३१४ सार्वजनिक ठिकाणी असणार्‍या कचरा संकलन केंद्रांची संख्या आता ९४१ पर्यंत खाली आली आहे.

> पालिकेची उद्याने, इमारती, रुग्णालये, कार्यालये अशा १ हजार २६ ठिकाणी ओल्या कचर्‍यापासून (व्हर्मी कंम्पोस्ट) खतनिर्मिती करणारे प्रकल्प सुरू करण्यात आले.

> २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आकाराचा भूखंड असणार्‍या सोसायट्या, इमारती किंवा दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा तयार होतो अशा सोसायट्या, रेस्टॉरंट, मॉल इत्यादींना त्यांच्या स्तरावर कचर्‍यापासून खतनिर्मिती करणारे प्रकल्प उभारणे बंधनकारक करण्यात आले. यामुळेही कचरा कमी झाला.

जनजागृती ठरली परिणामकारक
पालिका क्षेत्रातील झोपडपट्टी परिसर, चाळी, गावठाणे, छोट्या इमारतींदेखील जनजागृती करून या ठिकाणी कचर्‍यापासून खतनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आले. याशिवाय कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी, यादृष्टीने महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले. कचर्‍यासंदर्भातील तक्रारींच्या निवारणासाठी अ‍ॅप सुरू करण्यात आले. हे अ‍ॅप केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता अ‍ॅप’शी संलग्नित करण्यात आले.

हेल्प डेस्क, मार्गदर्शन केंद्र
स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी पालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये स्वतंत्रपणे ‘मदत कक्ष (पत्ज् अ‍ेव्) व मार्गदर्शन केंद्र’ सुरू करण्यात आले. तर महापालिकेच्या सर्व विभागात स्वच्छता मित्रांनी जनजागृती साधण्यास मदत केली. याचबरोबर पथनाट्य, रथयात्रा यासारखे अनेक उपक्रमदेखील राबविण्यात आले.

> १ हजार ६९० सामुदायिक शौचालये, ८९८ पे अ‍ॅण्ड युज टॉयलेट्स आणि १ हजार ९४१ वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली.
> उघड्यावरील हागणदारी आढळून आलेल्या ठिकाणी वर्षभरात ९४० शौचकुपे असलेली फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात आली.
> उघड्यावरील हागणदारी असणार्‍या परिसरात जनजागृती व प्रबोधनाच्या दृष्टीने पहाटे ४ वाजेपासून ‘गुड मॉर्निंग पथके’ कार्यरत.
> सार्वजनिक शौचालयांबाबत नागरिकांना त्यांची प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी अनेक सार्वजनिक शौचालयात ‘टॉयलेट रेटींग मशीन’ बसविण्यात आले.
> सार्वजनिक शौचालये शोधणे सोपे होण्याच्या दृष्टीने ‘अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप’ कार्यान्वित करण्यात आले. सार्वजनिक शौचालये, पेट्रोलपंप परिसरातील उपलब्ध शौचालये, रेल्वेस्थानक-बसस्थानाकांजवळील शौचालये गुगल मॅपवर दर्शविण्यात आली.