ऑनलाइन सेवा देणाऱ्या पालिकेचा ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईकरांना तब्बल 60 सेवा ऑनलाइन देणाऱ्या महापालिकेचा केंद्र सरकारने ‘डिजिटल इंडिया’ पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. पालिकेच्या ऑनलाइन सेवांमध्ये विविध परवानग्या, दाखले नागरिकांना घरबसल्या मिळत असल्यामुळे पालिका कार्यालयांतील खेटे वाचल्याने वेळेची बचत होत आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते ‘आऊटस्टँडिंग डिजिटल इनिशिएटिव्ह बाय लोकल बॉडी’ या वर्गवारीतील रजत पुरस्काराने बृहन्मुंबई महापालिकेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला.

मुंबई महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे बांधकाम परवानगी देण्यासाठी लागणारा वेळ, बांधकाम परवानग्यांमधील टप्पे कमी करणे, बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी लागणाऱ्या शुल्क आकारणीत कपात, सुस्पष्ट, सोपी व सर्वसमावेशक नियमावली अंमलात आली आहे. याची दखल घेऊन केंद्र सरकारने पालिकेचा सन्मान केला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान सचिव अजय प्रकाश साहनी, राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक डॉ. गुलशन राय यांच्या उपस्थितीत दिल्लीतील ‘इंडिया हॅबिटॅट सेंटर’मध्ये संपन्न झालेल्या एका भव्य कार्यक्रमात मुंबई महापालिकेचा डिजिटल इंडिया पुरस्काराने गौरव करण्यात आला. पालिकेच्या वतीने व्यवसाय विकास कक्षाच्या प्रमुख शशी बाला व माहिती तंत्रज्ञान खात्याचे संचालक अरुण जोगळेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

लवकरच आणखी 53 सेवा ऑनलाइन देणार

पालिकेच्या प्रशासकीय कामकाजामध्ये सुधारणा, महसूल संकलनात वाढ, कार्यपद्धतींमध्ये सुसूत्रता यावी आणि कामकाजात अधिकाधिक पारदर्शकता यावी यासाठी माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा अधिकाधिक सक्षम करण्यात आल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत विविध 60 सेवा ऑनलाइन करण्यात आल्या असून लवकरच आणखी 53 सेवा ऑनलाइन केल्या जाणार आहेत.