Lok Sabha 2019 राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

सामना प्रतिनिधी। मुंबई

लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या यादीत मावळ, शिरूर, माढा येथील जागांबाबत सस्पेन्स ठेवण्यात आल्यानंतर शुक्रवारी दुसरी यादी जाहीर करण्यात आली. दुसऱया यादीत मात्र ज्याच्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी माढाची उमेदवारी मागे घेतली त्या नातू पार्थ पवार यांची मावळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र माढा, नगरसाठी अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत.

पार्थ पवार, समीर भुजबळ, अमोल कोल्हे यांना उमेदवारी

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या राष्ट्रवादीच्या दुसऱया यादीत एकूण पाच जणांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. पार्थ पवार यांच्यासह शिरूरमधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ, बीडमधून बजरंग सोनावणे, दिंडोरीमधून धनराज महाले यांची नावे जाहीर झाली आहेत. नाशिकमधून आमदार छगन भुजबळ यांना की त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना उमेदवारी द्यायची याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकमत होत नव्हते. मात्र छगन भुजबळ यांनीच यासाठी नकार दिल्याने अखेर माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

माढाबाबत सल्लामसलत करूनच निर्णय
दुसरीकडे नगरच्या जागेसाठी आग्रही असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱया यादीतही यासाठी उमेदवार सापडलेला नाही. ज्या जागेवरून स्वतः शरद पवार यांनी उमेदवारी मागे घेतली त्या जागेसाठीही अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. माढाच्या जागेबाबत सर्वांशी सल्लामसलत करूनच निर्णय घेण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.