नीरज देसाईला 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

4
सीएसएमटीजवळ कोसळलेल्या पूलाचा सांगाडा

सामना प्रतिनिधी। मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ‘हिमालय’ पूल दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी अटक केलेल्या नीरज देसाई या स्ट्रक्चरल ऑडिटरला कोर्टाने 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दुर्घटनाग्रस्त ‘हिमालय’ पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट नीरज देसाईच्या कंपनीने केले होते. त्यांच्या अहवालानुसार तो पूल ‘गुड कंडिशन’मध्ये होता. मात्र तरीदेखील पूल कोसळून सहा जणांचा जीव गेला. या दुर्घटनेला पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱया डी. डी. देसाई कंपनीचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचा अहवाल पालिकेकडून मिळाल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सोमवारी नीरज देसाईला अटक केली. त्यानंतर त्याला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान, डी. डी. देसाई कंपनीने शहरातील जवळपास 77 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यातील ‘हिमालय’ पूल कोसळला. त्यामुळे उर्वरित 76 पुलांचे या कंपनीने कशाप्रकारे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. कंपनीने स्वतः केले की कुठल्या एजन्सीकडून करून घेतले या संबंधित आवश्यक कागदपत्रांची तपासणी करायची असून आणखी वेगवेगळय़ा अंगाने तपास करणे आवश्यक असल्याने नीरज देसाईची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली होती.