मुंबईची नवी एसी लोकल दमदार पीकअप घेणार

सध्या चर्चगेट ते वांद्रे फर्स्ट क्लास प्रवासास ७० रुपये तिकीट आहे. तर चर्चगेट ते बोरीवली प्रवासास १४० रुपये तर चर्चगेट ते विरार प्रवास १७० रूपये तिकीट आकारण्यात येते.

सामना प्रतिनिधी । मुंबई 

पश्चिम रेल्वेवर धावत असलेल्या वातानुकूलित लोकलचा थंडा फंडा अप डाऊन होत असताना आता येणारी दुसरी एसी लोकल जरा एक्स्ट्रा स्पीडवाली आहे. ही लोकल झटकन पिकअप घेणारी असून फलाटावरून निघताना स्वयंचलित दरवाजांना उघड झाप करण्यास लागणारा वेळ त्यामुळे वाचणार आहे. पश्चिम रेल्वेवर ‘भेल’ (भारत हेव्ही इलेक्ट्रीकल) कंपनीची एसी लोकल सध्या धावत असून तिच्या बारा फेर्या होत आहेत. या कंपनीचे टेंडर आधीच दिल्याने मुंबईत यापुढे येणाऱ्या पुढील दहा एसी लोकलही त्याच ‘भेल’ कंपनीच्या आहेत.

देशातील उपनगरीय मार्गावर धावणारी ही पहिलीच वातानुकूलित लोकल असल्याने तिच्यात अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे ‘भेल’कंपनीने तंत्रज्ञानात बदल करून चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात बांधलेल्या या लोकलमध्ये आधुनिकीकरण केले आहे. ‘भेल’च्या या दहा लोकल टप्प्याने मुंबईत दाखल होणार असून त्यात मोटर यंत्रणा डब्यांच्या खाली बसविण्यात आल्याने मोटर कोचची साठीची जागा प्रवाशांच्या आसनांसाठी उपलब्ध होऊन अधिक प्रवाशांना बसता येईल.

प्रवाशांना अधिक जागा
मोटरची क्षमता पन्नास टक्के वाढल्याने तसेच ब्रेकिंग प्रणाली अधिक कार्यक्षम असल्याने गाडी वेगाने पिकअप पकडते. त्यामुळे दरवाजे स्वयंचलितपणे बंद करण्यास लागणारा जादा वेळ गाडी वेगाने फलाटावरून निघणार असल्याने भरून निघणार आहे. दहा पैकी चार एसी लोकल मध्य रेल्वेला मिळणार असून त्यासाठी मेन की हार्बरवर ही एसी गाडी चालवायची यावर खलबते सुरू आहेत.