महायुतीसाठी सोपा पेपर ! उत्तर मुंबईत पुन्हा गोपाळ शेट्टी

146
gopal-shetty

सामना प्रतिनिधी । मुंबई

उत्तर-मुंबई लोकसभा मतदारसंघ म्हणजे महायुतीचा बालेकिल्लाच. महायुतीसाठी हा मतदारसंघ म्हणजे सोपा पेपर असल्याची चर्चा सुरुवातीपासूनच होती. नागरिकांचे आणि एक्झिट पोलचे अंदाज तंतोतंत खरे ठरले असून महायुतीचे गोपाळ शेट्टी तब्बल 4 लाख 53 हजारांहून अधिक मताधिक्याने या मतदारसंघातून निवडून आले आहेत.

गोपाळ शेट्टी यांना या मतदारसंघातून आव्हान देणे कठीण असल्याने काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी या मतदारसंघाऐवजी उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे ठरवले. काँग्रेसला कोणताही उमेदवार मिळत नसल्याने ऐनवेळी त्यांनी सेलिब्रेटी कार्ड वापरत उर्मिला मातोंडकरला येथून संधी दिली. गोविंदाने ज्याप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला त्याचप्रमाणे उर्मिलाला उभे करून गोपाळ शेट्टी यांचा विजयरथ रोखण्याचा काँग्रेसचा मनसुबा होता. रस्त्यावर ज्यूस पिणे, मुलांसोबत क्रिकेट खेळणे, रिक्षाचालकांसोबत सेल्फी काढणे असे विविध प्रचाराचे फंडे वापरून उर्मिला सुरुवातीपासूनच चर्चेत होती, परंतु तिला विभागातील समस्यांची जाण नसल्यामुळे सेलिब्रेटीपेक्षा विकासकामांना पसंती देत मतदारराजाने भरघोस मतांनी गोपाळ शेट्टी यांना निवडून दिले.

बोरिवली, दहिसरमधून मतांचा पाऊस
उत्तर मुंबईतील बोरिवली, दहिसर, चारकोप, मागाठाणे येथील मराठी आणि गुजराती-मारवाडी मतदारांनी नेहमीप्रमाणे महायुतीच्या पारडय़ात भरभरून मतदान केले आहे. बोरिवली, दहिसर, चारकोपमध्ये शिवसेनेने केलेल्या विकासकामांचाही मोठा फायदा गोपाळ शेट्टी यांना झाला. बोरिवली आणि दहिसरमध्ये शेट्टी यांना अनुक्रमे 1 लाख 52 हजार 611 आणि दहिसरमधून 1 लाख 15 हजार 223 मते मिळाली आहेत. याच मतदारसंघात उर्मिलाला अनुक्रमे 34,044 आणि 35,804 इतकीच मते मिळाली आहेत. मालवणीत केलेल्या विकासकामांचाही फायदा गोपाळ शेट्टी यांना झाला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही मालाड पश्चिम मतदारसंघात महायुतीला 88 हजार 865 मते मिळाली आहेत. दुसरीकडे याच मतदारसंघातून उर्मिलाला 68 हजार 838 मते मिळाली आहेत.

असे आहे मतांचे गणित

गोपाळ शेट्टी यांना उत्तर मुंबईतील एकूण मतदानाच्या 71 टक्के मते मिळाली आहेत. त्यांना एकूण 7 लाख 66 हजार 78 मते मिळाली आहेत. दुसऱया क्रमांकावर असलेल्या उर्मिलाला 24.39 टक्के म्हणजेच 2 लाख 41 हजार 431 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर येथे सपशेल फेल ठरल्याचे दिसले. तिसऱया क्रमांकावर असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सुनील थोरात यांना केवळ 15 हजार 629 मते मिळाली आहेत.

gopal-f

आपली प्रतिक्रिया द्या