उत्तर-मध्य मुंबई वार्तापत्र- विकासकामेच बाजी मारणार

2

सामना प्रतिनिधी। मुंबई

मुंबईतील लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वात महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये समावेश असणाऱया ‘उत्तर-मध्य’ मतदारसंघात शिवसेना-भाजप-रिपाइं युतीच्या उमेदवार पूनम महाजन यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. वांद्रे पूर्व-पश्चिम, विलेपार्ले, कुर्ला, चांदिवली, कलिना अशा उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीयांच्या संमिश्र मतदारसंघात पूनम महाजन यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या अनेक विकासकामांमुळे प्रचारात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे उत्तर-मध्य मतदारसंघात पुन्हा एकदा भगवा फडकणार असल्याचे चित्र आहे.

उत्तर-मध्य मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यात लढत होत आहे. प्रिया दत्त यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संपर्क नाही. याउलट पूनम महाजन यांनी निवडून आल्यानंतर मतदारांशी असलेले नाते कायम ठेवले आहे. त्यामुळेच कलिना येथील कार्यालयात दररोज शेकडोंच्या संख्येने येणाऱया नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत असल्याची भावना मतदार व्यक्त करीत आहेत. विमानतळ परिसरातील झोपडपट्टीवासीयांना घरे, संरक्षण दलाच्या जमिनीवरील रहिवाशांच्या कायमस्वरूपी घरांसाठी बायोमेट्रिक प्रक्रिया, कब्जेहक्काने दिलेल्या शासकीय जमिनी मालकी हक्काने रूपांतरित करताना 25 ऐवजी 10 टक्के प्रीमियम असे अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. पूनम महाजन यांनी आपल्या कार्यकाळात 1428 सार्वजनिक शौचालये, मंदिर-बुद्धविहार, सार्वजनिक सभागृहांची बांधणी-नूतनीकरण-दुरुस्ती अशी विविध कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. मोठय़ा प्रमाणात नागरिकांच्या मागण्या आणि प्रश्न मार्गी लागल्यामुळे पुन्हा एकदा मतदार पूनम महाजन यांच्याच पाठीशी राहणार असल्याचे बोलले जात आहे.

नागरी सुविधांना प्राधान्य

सर्वसामान्य नागरिकांसाठी पूनम महाजन यांच्या माध्यमातून नियमितपणे आयोजित करण्यात येणारी आरोग्य शिबिरे, मोफत रुग्णवाहिका सेवा, स्वच्छ भारत अभियान, दिव्यांगांसाठी मदतीचे उपक्रम, नागरिक-युवकांसाठी विविध फेस्टिव्हल, रेल्वे स्थानकांवर सरकते जिने, फ्लायओव्हर, उद्याने-मैदाने, विभागातील पोलीस ठाण्यांच्या इमारतींची दुरुस्ती-सीसीटीव्ही लावणे, सांस्कृतिक उपक्रम, क्रीडा स्पर्धा, योगा शिबीर यामुळे मतदारांशी त्यांचा चांगलाच संपर्क राहिला आहे. सर्वसामान्यांसाठी असणाऱया सरकारच्या अनेक योजना त्यांनी आपल्या मतदारसंघात राबवल्या आहेत.

अशी आहे मतदारांची आकडेवारी
संमिश्र स्वरूपाच्या या मतदारसंघात सुमारे 16 लाख मतदारांपैकी सुमारे पाच लाख मराठी भाषिक मतदार आहेत. पाच लाखांवर मुस्लिम मतदार, दोन लाख 70 हजार उत्तर भारतीय मतदार, दीड लाख गुजराती-राजस्थानी, ख्रिश्चन 10 हजार आणि इतर अन्य जातीचे मतदारही या विभागात आहेत.