राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, चिंपांझी आणि सिंह आणणार

सामना प्रतिनिधी। मुंबई

भायखळय़ाच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात लवकरच झेब्रा, जिराफ, चिंपांझी आणि फ्लेमिंगो असे परदेशी पाहुणे येणार असून त्यांच्या निवासासाठी राणीच्या बागेत सध्या जय्यत तयारी सुरू आहे. परदेशी पाहुण्यांबरोबरच पांढरा सिंह, वाघ, बिबटय़ा, लांडगा, तरस, अस्वल असे देशातील प्राणीही येणार आहेत. प्राणिसंग्रहालयाच्या होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विकासांतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
राणीच्या बागेत मुंबईसह देशविदेशातील पर्यटक दररोज हजारोंच्या संख्येने येत असतात. ऑगस्ट 2017 मध्ये राणीबागेत पेंग्विन आल्यापासून या ठिकाणी येणाऱया पर्यटकांच्या संख्येत लाखोंची वाढ झाली आहे. राणी बागेच्या सुधारणांचे दोन टप्पे अंतिम टप्प्यात असून तिसऱया टप्प्यातील आव्हानात्मक कामांचा शुभारंभ करण्यात येत आहे. यामध्ये प्राणिसंग्रहालयाचा विस्तार करण्यात येणार असून पालिकेच्या ताब्यात असलेल्या 12 एकरच्या भूखंडावर विदेशी प्राण्यांकरिता विविध सेवा विकसित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱहाड, उपायुक्त सुधीर नाईक, उद्यान संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांच्या उपस्थितीत नवीन सुधारणांची माहिती देण्यात आली.

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाने राणीच्या बागेचे आधुनिकीकरण आणि आकर्षक विस्तार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या बृहत् आराखडय़ास केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीने मंजुरी दिली आहे.

येणारे विदेशी पाहुणे

जग्वार, चित्ता, पांढरा सिंह, पाणघोडा, वॅलेबी, झेब्रा, जिराफ, मॅड्रिल मंकी, ओकापी, इमू, शहामृग, चिपांझी लेसर प्लेमिंगो, रिंगटेल लेमूर हे प्राणी आणले जाणार असून त्यांच्यासाठी पिंजरे बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये पक्षीगृह-3 बनविण्यात येणार आहे. तिसऱया टप्प्यासाठी निविदा मागवण्याचे काम सुरू असून मे 2019मध्ये ही कामे सुरू होतील. या कामांसाठी 200 कोटींचा खर्च केला जाणार आहे. दोन वर्षांत हे काम सुरू होईल.

हे असणार देशी प्राणी

प्रकल्पाच्या दुसऱया टप्प्यात वाघ, आशियाई सिंह, बिबटय़ा, तरस, लांडगा, देशी अस्वल, कोल्हा, बाराशिंगा, काकर, चितळ, नीलगाय, चौशिंगा, काळवीट, लहान मांजर, सांबर, चितळ, काकर असे प्राणी आणले जाणार आहेत. शिवाय पक्षीगृह-1 व 2, सर्पालयही बनविण्यात येणार आहे. शिवाय गांडूळ खत प्रकल्प, जुन्या कार्यालयाजवळील उद्यानही विकसित केले जाणार आहे.