अकरावी ऑनलाइन प्रवेशाची वेबसाईट सुरू

1

सामना प्रतिनिधी। मुंबई

2019-20 या वर्षातील अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी ज्युनियर कॉलेजमधील उपलब्ध जागा, विषय बदल, वाढीव तुकडी आदी माहितीसंदर्भात बदल करण्यासाठी 24 एप्रिलपासून अकरावी प्रवेशाच्या वेबसाईटची लिंक सुरू होणार आहे. या वेबसाईटवर 4 मेपर्यंत कॉलेजना आवश्यक बदलांची नोंदणी करता येणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. त्यामुळे यंदाही सर्व ज्युनियर कॉलेजची ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे. कॉलेजमधील बदलांची ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर बदलासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे घेऊन 4 मेपर्यंत कॉलेजनी भांडुप येथील रामानंद आर्य डीएव्ही कॉलेजमध्ये संपर्क साधायचा आहे, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे.

ज्युनियर कॉलेजच्या माहितीत कोणताही बदल नसल्यास वर्ष 2018-19 या वर्षाची कॉलेजची माहिती यंदाही अंतिम करण्यात येणार आहे, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.