उत्तर-पश्चिममध्ये शिवसेनेचाच आवाज

74

सामना प्रतिनिधी । मुंबई

केवळ विकासावर भर देणाऱया शिवसेनेचे शिलेदार शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांना 2014 प्रमाणेच मतदारराजाने प्रचंड बहुमताने विजयी केले. सुखकर रेल्वे प्रवास, म्हाडा वसाहती, झोपडपट्टय़ांच्या पुनर्विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे खूश झालेल्या मतदारांनी कीर्तिकर यांना 2 लाख 60 हजार इतक्या मताधिक्याने निवडून दिले. यामुळे येथील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे वर्चस्व विधानसभा निवडणुकीतही कायम राहणार आहे.

काँग्रेसच्या उमेदवाराला धोबीपछाड

शिवसेनेपाठोपाठ या मतदारसंघातील प्रबळ उमेदवार मानले जाणारे काँग्रेस नेते गुरुदास कामत यांच्या अकाली निधनामुळे संजय निरुपम यांनी या ठिकाणी उमेदवारी मागितली. या उमेदवारी मिळाली, पण कामत गटाने निरुपम यांच्यासोबत जाणे टाळले. त्याचप्रमाणे मतदारांनीही आपली नाराजी मतपेटीतून दाखविल्याने 2 लाख 60 हजार मतांनी निरुपम यांचा पराभव झाला.

आदर्श मतदारसंघ घडविण्याचा निर्धार
केवळ उपनगरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आदर्श मतदारसंघाचा दर्जा मुंबई उत्तर-पश्चिमला मिळावा यासाठी विकासकामांचे मोहोळच या मतदारसंघात उठवणार. मतदारसंघातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासोबतच उपनगरी रेल्वे प्रकाशांच्या समस्यांचे निराकरण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून करण्याचे वचनही खासदार कीर्तिकर यांनी मुंबईकरांना दिले आहे. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघ हा निवासी आणि औद्योगिक पट्टा मिळून बनलेला आहे. या मतदारसंघातील निवासी नागरिकांसोबत व्यापारी आणि छोटय़ा उद्योजकांच्याही समस्यांना वाचा फोडण्याचे काम करू आणि मतदारसंघाला आदर्श रूप देण्याचे स्वप्न शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीने पहिले आहे. येत्या पाच वर्षांत हा मतदारसंघ राज्यातच नव्हे तर देशात आदर्श ठरेल, असा विश्वासही खासदार कीर्तिकर यांनी व्यक्त केला.

अंधेरी-वर्सोव्यातील उच्चभ्रू वस्ती, बंगले, कोळीवाडे त्याचप्रमाणे जोगेश्वरी, दिंडोशी, गोरेगावातील म्हाडा वसाहती आणि झोपडपट्टी असा सर्वसमावेश मतदारांचा हा मतदारसंघ आहे. जोगेश्वरी, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम या सहाही मतदारसंघांमध्ये कीर्तिकर हे आघाडीवर राहिले. या मतदारसंघात सुमारे साडेसहा लाख मराठी मतदार आहेत. त्याखालोखाल 3 लाख 65 हजार उत्तर हिंदुस्थानी, 3 लाख 45 लाख मुस्लिम, दोन लाख गुजराती तसेच मारवाडी अशी संमिश्र वस्ती असलेल्या मतदारसंघांत जात-पात-धर्म बाजूला ठेवून मतदारांनी कीर्तिकरांना निवडून दिले. जोगेश्वरी, गोरेगावमध्ये एक लाखावर तर दिंडोशी, अंधेरी पूर्व या तिन्ही मतदारसंघांत कीर्तिकर यांना 90 हजारांवर मते मिळाली आहे. ज्या वर्सोवा भागात त्यांच्याविषयी नाराजी आहे असे बोलले जात होते तिथेही 69 हजार मते त्यांना मिळाली असून प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 10 हजार मतांनी ते पुढे होते.

table-final

 

आपली प्रतिक्रिया द्या