इन्शुरन्सचे पैसे लाटण्यासाठी मालकाने चोरली मर्सिडिज

8

सामना प्रतिनिधी। मुंबई

इन्शुरन्सचे पैसे लाटण्यासह सोबत काम करणाऱयांना त्रास देण्यासाठी दिल्लीतल्या एका कन्स्ट्रक्शनचे काम करणाऱयाने युक्ती केली. त्याने कामानिमित्त मित्रांकरवी त्याची मर्सिडीज कार मुंबईला पाठवली आणि गुपचूप मुंबईत येऊन ती कार चोरून दिल्लीला नेली. आर. ए. किडवाई मार्ग पोलिसांनी कार मालकाचा डाव उधळून लावत मालकाला बेडय़ा ठोकल्या.

विजय धवन (62) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दिल्लीत राहणारा विजय कन्स्ट्रक्शनची कामे करतो. तेथेच राहणारे जुल्फीकार अब्दुल वकील अहमद आणि लालबहाद्दूर सिंग ऊर्फ प्रेम हे दोघेही धवनसोबत काम करायचे. धवनला दोघांचे काही पैसे देणे होते, पण धवन पैसे देण्यास चालढकलपणा करीत होता. दरम्यान, धवनने त्याची मर्सिडीज कार मुंबईला घेऊन जाण्यास जुल्फीकार आणि प्रेमला सांगितले होते. त्यानुसार ते दोघे 26 मेच्या सकाळी मर्सिडीज कार घेऊन मुंबईत आले. धवनने त्यांना वडाळा येथील सकर पंचायत गेस्ट हाऊस येथे थांबण्यास सांगितले. तेथे पोहचल्यावर एक व्यक्ती येईल त्याच्याकडे कारची चावी द्या. तो काम आटोपून पुन्हा कारची चावी तुमच्याकडे देईल मग तुम्ही पुन्हा कारने दिल्लीला या असे धवनने त्यांना सांगितले. 26 तारखेच्या दुपारी मुंबईत आल्यानंतर थोडा आराम करून दोघेही मुंबई दर्शनासाठी हॉटेलबाहेर पडले. रात्री 10 वाजता ते हॉटेलवर परतले तेव्हा कार पार्क केली तेथेच होती, पण धवनचा मित्र काही आला नाही. दरम्यान, दुसऱया दिवशी जुल्फीकार आणि प्रेम हॉटेलच्या खाली आल्यावर कार तेथे नसल्याचे आढळून आले. त्यामुळे दोघांनी इतरत्र विचारपूस करून आर. ए. किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राजेश खाडे, उपनिरीक्षक प्रताप लामतुरे व पथकाने तपास सुरू केला.

दिल्ली मेट्रोच्या खाली कपडय़ाने झाकून ठेवली कार
26 तारखेच्या रात्री 10 वाजता कार जागेवर असल्याचे पाहून दोघे हॉटेलच्या रूमवर गेल्यानंतर 11 वाजता कार चोरीला गेली. परिसरात सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांनी मर्सिडीज कंपनीशी संपर्क साधून चावीबाबत विचारणा केली. तेव्हा खूप दिवसांपूर्वी कार मालक विजय धवन याने नवीन चावी बनवून घेतल्याचे निष्पन्न झाले. म्हणजे एक चावी धवनकडे तर दुसरी जुल्फीकारजवळ असल्याचे कार बनावट चावीने चोरणे शक्यच नसल्याने पोलिसांनी दिल्ली गाठली. धवनला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने कार दिल्ली मेट्रोच्या खाली कपडय़ाने झाकून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी कार जप्त करून धवनला मुंबईत आणून अटक केली.

विमानाने येऊन कार घेऊन गेला
26 तारखेला धवन विमानाने मुंबईत दाखल झाला. रात्री 10 वाजता दोघेही कार बघून गेल्याचे पाहिल्यानंतर त्याने 11 वाजता कार घेऊन पोबारा केला ते थेट दिल्लीच गाठली. इन्शुरन्सचे पैसे मिळविण्याबरोबर त्या दोघांना त्रास देण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याची कबुली धवनने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या