मुंबईकरांची झोप ठरतेय अपुरी: वेकफिट सर्वेक्षण

335

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईकरांना पुरेशी झोप मिळत नसून त्याचे परिवर्तन निद्रानाश, असंतुलित झोप यांसारख्या समस्यांमध्ये होत असल्याची धक्कादायक बाब वेकफिट या हिंदुस्थानच्या आघाडीच्या मॅट्रेस आणि झोपेशी संबंधित उत्पादनांच्या कंपनीने देशातील झोपेसंबंधी माहिती गोळा करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाली आहे. पुरेशी झोप मिळत नसल्याचा परिणाम मुंबईकरांच्या कामावरदेखील होत असून त्यांनी कामावर झोप येत असल्याचे मान्य केले आहे. ७९ टक्के मुंबईकरांना आठवड्यातून १-३ वेळा कामावर झोप येते, आठवड्यातून ४-५ वेळा झोप येणाऱ्यांचे प्रमाण ६ टक्के आहे तर रोज कामावर झोप येणाऱ्यांचे प्रमाण १५ टक्के इतके आहे.

सातत्यपूर्ण अपुऱ्या झोपेचे आपले मन आणि शरीरावर परिणाम होतात. आपल्याला सतत थकल्यासारखे वाटते आणि त्याचा त्रास होतो. वेकफिटच्या सर्वेक्षणातून हीच बाब प्रकर्षाने जाणवते. अपुऱ्या झोपेमुळे ५३ टक्के लोकांना पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे तर १८ टक्के लोकांना निद्रानाशाची समस्या भेडसावत आहे.

सर्वेक्षणातून असे दिसून आले की १७ टक्के लोक मध्यरात्रीनंतर झोपतात आणि ४० टक्के लोक रात्री ११ नंतर झोपतात. खरे तर, आपल्या शरीराच्या रचनेनुसार रात्री १०-१०.३० ही झोपण्याची नियमीत वेळ असावी असा सल्ला दिला जातो पण या वेळेत झोपी जाणाऱ्यांचे प्रमाण केवळ २८ टक्के इतकेच आहे. रात्री उशीरा झोपल्यामुळे आपण उशीरा आणि थकलेले उठतो असे मत २० टक्के लोकांनी व्यक्त केले असून ते सकाळी ८ नंतर जागे होतात. सुमारे एक तृतीयांश म्हणजे ३१ टक्के लोकांना सात तासांपेक्षा कमी झोप मिळते तर १८ वर्षे वयाखालील २७ टक्के लोकांना फक्त ६ तासांची झोप मिळते. ही त्यांच्या वाढीच्या महत्वाच्या टप्प्यात अत्यंत धोकादायक गोष्ट आहे.

मुंबईकरांना रात्रभर जागवणाऱ्या गोष्टींमध्ये स्मार्टफोन्सपासून टीव्हीपर्यंत सातत्याने मनोरंजन करणारी ही व्यासपीठे खऱ्या अर्थाने झोपेला आपल्या डोळ्यांपासून दूर ठेवण्यासाठी जबाबदार आहेत. सुमारे २४ टक्के प्रतिसादकांनी सांगितले की मोबाइल फोन आणि टीव्हीवर शो आणि वेब सीरीज पाहिल्याने ते जागे राहतात, १५ टक्के लोक अगदी पहाटेपर्यंत आपल्या लॅपटॉपवर काम करतात तर २१ टक्के लोक सोशल मीडिया फीड्स सातत्याने तपासत राहतात. सुमारे २२ टक्के लोकांनी भविष्याची चिंता हे झोप उडण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले.

झोपेची योग्य सवय आणि झोपण्याचे दर्जेदार साहित्य जसे चांगली गादी आणि बेडशीट यांच्यामुळे आपल्याला चांगली झोप मिळू शकते असे मत प्रतिसादकांनी व्यक्त केले. झोपेच्या समयी स्मार्टफोन आणि लॅपटॉपचा वापर टाळल्यास २६ टक्के लोकांना चांगली झोप लागेल असे वाटते तर जवळपास ४७ टक्के लोकांच्या मते त्यांच्या गादीचा दर्जा सुधारल्याने त्यांना जास्त चांगले आणि शांतपणे झोपता येईल.

या सर्वेक्षणाबाबत बोलताना वेकफिटचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित गर्ग म्हणाले, “ग्रेट इंडियन स्लीप कार्ड २०१८ मधील अत्यंत महत्वाची बाब म्हणजे जितका जास्त विकास होतो आहे तितके आपल्या भारतीयांना निद्रानाश, असंतुलित झोप आणि पाठीच्या समस्या भेडसावत आहेत. याशिवाय, प्रत्येक ग्राहकाची अशी इच्छा असते की आपल्याला अगदी ५-६ तासांची झोप मिळाली तरी इतकी छान लागावी की खरंच आपला आराम होईल.”

वेकफिटचे सर्वेक्षण हिंदुस्थानातील ७५०० प्रतिसादकांकडून तीन महिन्यांच्या कालावधीत आलेल्या माहितीवर आधारित असून एक देश म्हणून आपण दररोज प्रचंड थकलेल्या अवस्थेत का जागे होतो याचे डोळे उघडणारे पुरावे यातून समोर आले आहेत. सुरुवातीला हे सर्वेक्षण विविध प्रकारच्या प्रतिसादकांवर करण्यात आले आहे. यातील ७१ टक्के लोक विवाहित आहेत, २६ टक्के लोक सिंगल आणि ३ टक्के लोकांची झोप उडाली आहे म्हणजेच ते प्रेमात पडले आहेत. बंगळुरू, दिल्ली, गुरूग्राम, हैदराबाद, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या सात महानगरामध्ये ६९ टक्के प्रतिसादक होते. त्यातील ८१ टक्के प्रतिसादक २५-४४ वर्षे वयोगटातील आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या