५००व्या सामन्यात यजमानांची घसरगुंडी

सामना ऑनलाईन । मुंबई

१००, २००, ३०० व ४०० व्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या बलाढय़ मुंबईला गुरुवारपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू झालेल्या ५०० व्या रणजी स्पर्धेतील ‘क’ गटाच्या लढतीत पहिल्याच दिवशी निराशेचा सामना करावा लागला. अतित शेठ व लूकमन मेरीवाला यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर मुंबईचा पहिला डाव १७१ धावांमध्ये गडगडला. त्यानंतर बडोद्याने पहिल्या दिवसअखेर १ बाद ६३ धावा तडकावल्या असून आता त्यांचा संघ फक्त १०८ धावांनी मागे आहे.

पहिल्याच षटकात २१ वर्षीय अतित शेठने या मोसमात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉला शून्यावरच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय खेळाडू अजिंक्य रहाणेलाही खेळपट्टीवर ठाण मांडता आले नाही. अतित शेठच्या गोलंदाजीवर त्याचा झेल दीपक हुडाने टिपला. त्यालाही भोपळा फोडता आला नाही. हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केलेल्या श्रेयस अय्यरसोबत कर्णधार आदित्य तरे याची जोडी जमली असतानाच लूकमन मेरीवालाने श्रेयस अय्यरला २८ धावांवर बाद केले.

३० व्या षटकांत मुंबईचा निम्मा संघ १०३ धावांवर बाद झाल्यानंतर यजमानांचा डाव सावरलाच नाही. अखेर त्यांचा डाव ५६.२ षटकांत १७१ धावांमध्ये गारद झाला. अतित शेठ व लूकमन मेरीवाला यांनी प्रत्येकी ५ गडी गारद केले. बडोद्याने अहमदनूर पठाणच्या (१४ धावा) मोबदल्यात ६३ धावा केल्यात. आदित्य वाघमोडे १५ धावांवर खेळत असून त्याच्यासोबत विष्णू सोलंकी (३२ धावा) खेळपट्टीवर उभा आहे.

एकीकडे मुंबईचे फलंदाज बाद होत असताना आदित्य तरेने बडोद्याच्या गोलंदाजांचा समर्थपणे मुकाबला केला. सूर्यकुमार यादव लूकमन मेरीवालाच्या गोलंदाजीवर १० धावांवर बाद झाल्यानंतर आदित्य तरेने अर्धशतक साजरे केले. त्याने ८२ चेंडूंत आठ चौकारांनिशी ५० धावा केल्या, पण त्यालाही मोठी खेळी करता आली नाही. अतित शेठच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला.

अंकित, रोहितची दमदार अर्धशतके
कर्णधार अंकित बावणे व रोहित मोटवानी यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर महाराष्ट्राने रणजी क्रिकेट स्पर्धेतील ‘अ’ गटाच्या लढतीत रेल्वेविरुद्ध पहिल्या दिवशी ५ बाद २४९ धावा तडकावल्या. अंकित बावणेचे शतक अवघ्या ८ धावांनी हुकले. त्याने ९२ धावांच्या खेळीत १ षटकार व १२ चौकार चोपून काढले. रोहित मोटवानी ५२ धावांवर खेळत आहे.

क्रिकेटप्रेमींची पावले स्टेडियमकडे वळेनात
मुंबई व बडोदा यांच्यामध्ये वानखेडे स्टेडियमवर रणजी लढत सुरू असून यजमान संघाची ही ५०० वी ऐतिहासिक लढत आहे. मात्र तरीही मुंबईच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मुंबईकर क्रिकेटप्रेमींनी स्टेडियमची वाट धरलेली नाही. गुरुवार हा दैनंदिन कामाचा दिवस असल्यामुळे कदाचित स्टेडियम रिकामे असावे. पण येत्या शनिवार व रविवार या वीकेण्डला तरी वानखेडेवर क्रिकेटप्रेमी येताहेत की नाही हाही यक्षप्रश्नच. सुनील गावसकर व एमसीए पॅव्हेलियनमध्ये तुरळक क्रिकेटप्रेमी सामन्याचा आनंद घेताना दिसत होते.