काय रे, अलिबागवरून आला आहेस का? उल्लेख काढण्यासाठी हायकोर्टात याचिका

2

सामना प्रतिनिधी। मुंबई

‘काय रे, अलिबागवरून आला आहेस का?’ असं हिणवून अलिबागकरांचा सर्रास अपमान का केला जात आहे? त्यामुळे सीबीएफसी आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने या प्रकरणी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करणारी याचिका अलिबागमधील रहिवाशांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर दोन आठवडय़ांनी सुनावणी होणार आहे.

अलिबागचे रहिवासी राजेंद्र मधुकर ठाकूर यांच्या वतीने ऍड. रघुराज देशपांडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. सेन्सॉर बोर्डाने कोणत्याही नव्या सिनेमा, जाहिरात यांना प्रमाणपत्र जारी करताना अशा प्रकारचा उल्लेख काढून टाकण्याचे आदेश द्यावेत तसेच सिनेमा, नाटक, टीव्हीवरच्या मालिका यातूनच प्रचलित झालेला, ‘काय रे, अलिबागवरून आला आहेस का?’ हा डायलॉग म्हणजे, ‘तू मूर्ख आहेस का?’ या आशयाचे उद्गार आहेत. त्यामुळे विनाकारण अलिबागसारख्या समृद्ध आणि महाराष्ट्रातल्या पर्यटनस्थळाची बदनामी टाळावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

अलिबागचे ऐतिहासिक महत्त्व

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात त्यांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी अलिबाग वसवले होते. निसर्गरम्य समुद्रकिनारे, सागरी किल्ले, देवस्थाने, अभयारण्य यांनी समृद्ध असलेल्या रायगड जिह्यातील हा भाग मुंबई आणि पुणेकरांचे विकेंडसाठी सर्वात आवडते ठिकाण आहे. त्यामुळे अलिबागला विशेष महत्त्व आहे, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.