मुंबईत ‘पडद्या’आडून अंमली पदार्थांची तस्करी, कोट्यवधींचे ड्रग्ज पोलिसांकडून जप्त

1

सामना ऑनलाईन । मुंबई

पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये म्हणून  तस्करांनी अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी नवीन शक्कल शोधून काढली आहे. या टोळीने अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी दारे खिडक्यांना लावण्यात येणाऱ्या पडद्याचा वापर करून त्यामार्फत अंमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचे पोलिसांच्या एका कारवाईत उघडकीस आले आहे.

मुंबईतील पश्चिम उपनगरातील आंबोली पोलीसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका नायजेरीन टोळीला अटक करून या टोळीजवळून पडद्याच्या रिंगा, तसेच शिलाई मध्ये दडवलेले सुमारे 6 किलो 492 ग्रॅम कोकेन, कापडी पडदे, पडद्याच्या रिंगा,पुठ्ठे, प्रेस मशीन,प्लास्टिक नळी, हस्तगत करण्यात आले आहे. हस्तगत करण्यात आलेल्या कोकेनची किंमत 38 कोटी 97 लाख रुपये असून अटक करण्यात आलेल्या या 4 जणांच्या नायजेरीन  टोळीत एका महिलेचा समावेश आहे. महिला आणि यातील एक आरोपी नुकताच अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातून जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले आहे.

निरस अबुझिक आखोवा (3५), सायमन अगोबता (32), मायकल संदे होप (29) कार्ले पिंटो आयरिस (ब्राझीलीयन महिला) असे अटक करण्यात आलेल्या टोळीचे नाव आहे. अंधेरी पश्चिम मौर्या इस्टेट रोड या ठिकाणी शनिवारी दुपारी आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी पथकासह सापळा रचून संशयावरून निरस अबुझीक आखोवा याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळ असलेल्या पडद्याची तपासणी केली असता पोलिसांना त्यात कोकेन हा अंमली पदार्थ पुठ्यात सापडल्या. पोलिसानी त्याला अटक करून त्याच्याजवळ चौकशी केली असता त्याने आपल्या सहकार्याचे नावे आणि पत्ता दिला.

निरसने दिलेल्या पत्याच्या ठिकाणी छापा टाकून इतरांना अटक करून कोकेन,पडदे, रिंगा, नळ्या, पुठे हस्तगत करण्यात आले आहे असल्याची माहिती पश्चिम उपनगराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.