फुगे मारणाऱ्यांवर पोलिसांची नजर, रासायनिक रंग विक्रेत्यांवर होणार कारवाई

सामना प्रतिनिधा । मुंबई

होळी आणि धुलिवंदनच्या दिवशी पादचाऱ्यांवर फुगे मारण्याचे प्रकार होऊ नयेत याची मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. असे कृत्य करणाऱ्यांविरोधात पोलीस कडक कारवाई करणार आहेत.

शहरात होळी सणाच्या काही दिवस अगोदरपासूनच रस्त्याने जाणाऱ्या पादचारी, महिलांवर रंग आणि पाणी भरलेले फुगे मारले जातात. फुगे मारल्यामुळे पादचारी जखमी झाल्याच्या घटना यापूर्वी मुंबईत घडल्या आहेत. अशा घटना घडू नयेत याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी रंगाचे पाणी टाकल्यास कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेकरिता खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी अश्लील बोलणे किंवा अश्लील गाणी बोलणे, हातवारे करणे यावर नजर ठेवण्यासोबतच रस्त्याने जाणाऱ्यांवर रंगाचे पाणी फेकले जाऊ नयेत याकरिता सूचना देण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. महाराष्ट्र पोलीस कायदा 1951नुसार असे प्रकार करणाऱ्यांविरोधात एनसी दाखल केली जाते. पण प्रकार गंभीर असल्यास अशांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

होळी सणापूर्वी शहरात रासायनिक रंगाची विक्री केली जाते. रासायनिक रंगांमुळे त्वचा, डोळे, यांना इजा होते. त्यामुळे अशा रंग विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. सहा वर्षांपूर्वी धारावी येथे रंगाची बाधा झाल्यामुळे 100 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा वापरलेले रंग हे बंद फॅक्टरीमधून आणले गेले होते.