पूनम महाजन सलग दुसऱयांदा लाखांवर फरकाने विजयी

182

सामना प्रतिनिधी। मुंबई

उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांत पुन्हा एकदा महायुती वरचढ ठरल्याने काँग्रेसचा सलग दुसऱयांदा सपाटून पराभव झाला आणि महायुतीच्या पूनम महाजन यांचा दणदणीत विजय झाला. पूनम महाजन यांनी काँग्रेस आघाडीच्या प्रिया दत्त यांचा सलग दुसऱया वेळी लाखांवर मताधिक्याने दारुण पराभव केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांना तब्बल 1 लाख 87 हजारांच्या मताधिक्याने तर 2019 च्या निवडणुकीत 1 लाख 30 हजारांच्या मताधिक्याने पराभूत केले.

वांद्रे पूर्व-पश्चिम, विलेपार्ले, कुर्ला, चांदिवली, कलिना अशा उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीयांच्या संमिश्र मतदारसंघात पूनम महाजन यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या अनेक विकासकामांमुळे प्रचारात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला होता. मात्र विरोधकांकडून पूनम महाजन मतदारसंघात फिरकत नसल्याचा खोटा प्रचार सुरू होता. मात्र विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पश्चिम अशा पाचही विधानसभा मतदारसंघांत मिळालेल्या घवघवीत यशाने विरोधकांची तोंडे बंद झाली आहेत. वांद्रे पूर्वमध्ये प्रिया दत्त यांना फक्त 1278 इतक्या मतांचे मताधिक्य मिळाले. या लोकसभा मतदारसंघात झालेल्या एकूण 8, 43,339 मतदानापैकी पूनम महाजन यांना तब्बल 53 टक्के मते मिळाली, तर प्रिया दत्त यांना केवळ 39 टक्के मतदानावर समाधान मानावे लागले. यात तिसऱया क्रमांकावरील अब्दुर अंजारिया यांना 33,703 तर चौथ्या क्रमांकावरील इम्रान खान यांना 4195 मते मिळाली. तर ‘नोटा’साठी 10,669 जणांनी मतदान केले. 20 पैकी तब्बल 15 उमेदवारांना एक हजारापेक्षा कमी मते मिळाली.

पब्लिक-पॉलिटीशन पार्टनरशिप मॉडेल राबवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ला महाराष्ट्रासह देशभरातील मतदारांनी साथ दिल्यामुळे आपण जनतेचे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया महायुतीच्या विजयी उमेदवार पूनम महाजन यांनी दिली. आगामी काळात नरेंद्र मोदी यांच्या ‘न्यू इंडिया’च्या स्वप्नासाठी आपण अहोरात्र कार्यरत राहू अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. उत्तर-मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवणारे मतदार, शिवसेना-भाजप-रिपाइं कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.

poo

आपली प्रतिक्रिया द्या