शरीरसुख दे, परीक्षेत पास करतो म्हणणाऱ्या प्राध्यापकावर गुन्हा दाखल

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाई। मुंबई

दक्षिण मुंबईतील एका नामांकित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने त्याच महाविद्यालयातील प्राध्यापकावर गंभीर आरोप केला आहे. या प्राध्यापकाने परीक्षेत पास करण्याबरोबरच हजेरी नियमित करण्याच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप या विद्यार्थिनीने केली आहे. पोलिसांनी या विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर प्राध्यापकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या हा प्राध्यापक फरार असून गांवदेवी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

संबंधित विद्यार्थिनी बीएस्सीच्या दुसऱ्या वर्गात शिकत असून ती वर्गात सतत गैरहजर रहात होती. सोमवारी मात्र ती कॉलेजला गेली. त्यावेळी रसायनशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापकाने तिला परीक्षेत पास करतो व तुझी हजेरीही नियमित करतो असे सांगत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. हे ऐकताच तरुणीची घाबरगुंडी उडाली. पण तरीही हिंमत करून एक दोन दिवसांनी तिने पालकांना याबद्दल सांगितले. त्यानंतर शुक्रवारी तिने गावदेवी पोलीस ठाण्यात जाऊन याबद्दल तक्रार केली. पोलिसांनी कॉलेजमध्ये चौकशी केली असता आरोपी प्राध्यापक कंत्राटी पद्धतीवर काम करत असल्याचे कळाले. संबंधित विद्यार्थिनी सतत गैरहजर राहत असल्याचे व गेल्याच वर्षी सप्टेंबरमध्ये तिने कॉलेजमधून नाव कमी केल्याची माहिती कॉलेज प्रशासनाने पोलिसांना दिली. विशेष म्हणजे प्राध्यापक त्रास देत असल्याबद्दल तिने कधी कोणालाही सांगितले नव्हते. मात्र सोमवारी प्राध्पाकाने तिच्याकडे थेट शरीरसुखाची मागणी केली. दरम्यान या घटनेनंतर प्राध्यापक फरार असून त्याचा शोध सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले आहे.