आंदोलनाला हिंसक वळण, मुंबई आणि उपनगरात परिस्थिती गंभीर

विक्रोळी पार्कसाईट

सामना ऑनलाईन । मुंबई

भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज दलित संघटनांकडून देण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेनंतर मुंबईसह राज्यभर आंदोलने करण्यात आली. मुंबईत अनेक ठिकाणी रस्तारोको, रेलरोको आंदोलन करण्यात आले तर आंदोलनकर्त्यांनी पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक रोखून धरली आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतूक सेवा पूर्णपण विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी वाहनांची मोडतोड करण्यात आली. कांजुरमार्ग स्टेशनमध्ये तोडफोड करण्यात आली, तर मध्य रेल्वेच्याच डोंबिवली स्थानकात तिकीट घराचे नुकसान करण्यात आले.

मुंबईतील अनेक भागात दगडफेक, जाळपोळ, तोडफोडीसारखे हिंसाचाराचे प्रकार देखील घडले. आंबेडकरी बांधवांची लोकसंख्या जास्त असलेल्या घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, भांडूप, वरळी अशा भागांमध्ये आंदोलनाचा प्रभाव पाहायला मिळाला. दुकाने व दैनंदिन व्यवहार बंद पाडण्यात आले होते. या भागात बेस्ट बसेस, खासगी वाहने, मोटर सायकलींची देखील तोडफोड करण्यात आली आहे. शहरात सर्वात जास्त तणाव चेंबूर आणि घाटकोपरमध्ये होता. भीमा कोरेगावमधील भ्याड हल्ल्यामागे असलेल्या संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन करतच राहणार, अशी भूमिका घाटकोपर रमाबाई नगर, कामराज नगरातील आंबेडकरी जनतेने घेतली होती. चेंबूर येथील नागरिकांनी चेंबूर येथील सायन पनवेल महामार्गावर वाहने रोखली होती. त्यामुळे या भागातही ट्रॅफिक जाम झाले होते. आंदोलकांनी पूर्व द्रुतगती मार्गावरची वाहतूक रोखून धरली असून महामार्गावरची वाहतूक गेल्या काही तासांपासून ठप्प आहे. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, गोवंडी, मानखुर्द, पवई या भागांमध्ये बेस्ट बसेस, खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी वाहनांच्या टायरमधील हवा काढण्यात आली. विक्रोळी व घाटकोपर भागात अनेक बस, चार चाकी वाहने व मोटारसायकलची तोडफोड करण्यात आली आहे. विक्रोळीतील पार्कसाईट येथे मोठ्या प्रमाणात दुचाक्या रस्त्यावर तोडफोड करून फेकण्यात आल्या होत्या.

आदोलकांनी मध्य, पश्चिम व हार्बर रेल्वेवरही जोरदार आंदोलने करत रेल्वे रोखून धरल्या होत्या. दादर, एलफिन्स्टन, विक्रोळी, घाटकोपर, ठाणे, कांजूरमार्ग, नाहूर, मुलुंड, डोंबिली, कल्याण, दहिसर, गोरेगाव, कांदिवली, विरार, चेंबूर, गोवंडी, पनवेल स्थानकात आंदोलकांनी जोरदार निदर्शने देत रेल्वे रोखून धरल्या होत्या. याचा फटका तिन्ही रेल्वे सेवांना बसला. तिन्ही मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प होती. तर त्यानंतर गाड्या काही मिनिटे उशिराने धावत होत्या. आदोलकांनी घाटकोपर ते विमानतळादरम्यानची मेट्रो सेवाही थांबविली होती. या आंदोलनांमुळे पश्चिम रेल्वेने आजच्या दिवसापुरता एसी लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. आंदोलकांनी कांजूरमार्ग स्थानकातील तिकीट घर, इंडिकेटर, तिकीट मशीनची तोडफोड केली आहे.