रवी पुजारी टोळीच्या चौघांना कारावास आणि दंडाची शिक्षा


सामना प्रतिनिधी । मुंबई

खंडणीच्या वादातून नाशिकच्या एका विकासकावर गोळीबार केल्याप्रकरणी रवी पुजारी टोळीच्या चारजणांना विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने कारावाससह दंडाची शिक्षा सुनावली. अरविंद प्रदीप चव्हाण, विकासकुमार मदनकुमार सिंग, संजय रामबहादूर सिंग ऊर्फ संजय थापा, संदीप रामाश्रय शर्मा अशी या चौघांची नावे आहेत.

नाशिक येथे ग्रीन वेलेचे मालक अशोक मोहनानी यांची कंपनी आहे. 2011 मध्ये मोहनानी यांना रवी पुजारीकडून धमकी आली होती. त्या धमकीकडे मोहनानी यांनी दुर्लक्ष केले होते. दहशत निर्माण करण्याकरिता रवी पुजारीच्या सांगण्यावरून चारजणांनी मोहनानी यांच्यावर गोळीबार केला होता. गोळीबारात दोघेजण जखमी झाले होते. या घटनेची दखल घेऊन तत्कालीन पोलीस महासंचालकांनी या गुन्हय़ाचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग केला होता.

तपास हाती येताच पोलिसांनी अरविंद, विकासकुमार व संजयला अटक केली होती. त्या चौघांविरोधात नाशिकच्या ‘मोक्का’ न्यायालयात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. नुकतीच या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. मोक्का न्यायालयाने आरोपीविरोधात सर्व साक्षीदार, तांत्रिक आणि कागदोपत्री पुरावे मान्य करून चौघांना दोषी ठरवले. न्यायालयाने अरविंद, विकासकुमार आणि संजय रामबहादूरला सश्रम कारावास आणि 5 लाख रुपये दंड तर संदीप शर्माला पाच वर्षांचा कारावास आणि पाच लाख रुपये दंड ठोठावला. याचा तपास सहायक आयुक्त अशोक दुराफे, के. व्ही. निगडे यांच्या मार्गदर्शनखाली एपीआय शिंदे, अंमलदार गोरक्षनाथ घुगे, मोहन मोरे यांनी केला होता.