बाप्पाच्या आगमनात धोकादायक पुलांचे विघ्न!

10

सामना प्रतिनिधी। मुंबई

मुंबईकरांच्या सुरक्षेचे कारण देत पालिकेने ऐन पावसाळय़ाच्या तोंडावर तब्बल 29 ब्रीज वाहतुकीसाठी बंद केल्याने चाकरमान्यांची कोंडी होणार असल्याचे समोर आले असताना मुंबईतील गणेशोत्सवावरही पुलांचे विघ्न आले आहे. करी रोड आणि चिंचपोकळीचे पूल बंद केल्याने दक्षिण मुंबईतील मोठे गणपती आणायचे कसे आणि मिरवणूक कशी काढावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने बंद केलेल्या पुलांच्या जागी वाहतुकीची काय व्यवस्था केली याचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.

चिंचपोकळी आणि करी रोडचा उड्डाणपूल हा अवजड वाहनांसाठी बंद करण्याच्या सूचना आयआयटीने मुंबई महापालिकेला केल्या आहेत. मुंबईतली मोठी गणेश मंडळे, गणेश चित्र कार्यशाळा लालबाग-परळ परिसरात आहेत. या दोन्ही पुलांवरूनच मुंबई शहर आणि उपनगरातील मोठय़ा गणेशमूर्तींचे आगमन-विसर्जन होते. शहर व उपनगरातील इतर पुलांबाबतही स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने या पुलांवर अवजड वाहनांना बंदी घातल्यास बाप्पाचे आगमन-विसर्जन करायचे कसे? असा प्रश्न येथील मंडळांसह मूर्तिकारांना पडला आहे.

मुंबईतले धोकादायक पूल अवजड वाहनांसाठी पालिका बंद करणार आहेत. त्यामुळे या पुलावरून गणेश मंडळांना वाहतुकीची परवानगी मिळणार का ? याबाबत आताच तोडगा निघायला हवा. यासंदर्भात पालिका आयुक्त आणि महापौर यांना आम्ही पत्र पाठवले असून पालिका अधिकारी, पूल विभाग, एमएमआरडीए, वाहतूक पोलीस आणि समन्वय समिती यांची तातडीने बैठक घेण्याची मागणी आम्ही केली आहे. असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष, ऍड. नरेश दहिबावकर

जमीनदोस्त झालेले पूल – यलो गेट पूल, महर्षी कर्वे रोड चंदनवाडी दक्षिण आणि उत्तर, रमाबाई पाडा गुरुनानक नगर (मुलुंड पश्चिम), खैरानी रोडवरील हरी मस्जिद नाल्यावरील पूल, संत मुक्ताबाई हॉस्पिटल-बर्वेनगर येथील पूल.

बंद होणारे पूल – मेघवाडी नाला शामनगर वाहतूक पूल, वांद्रे-धारावी रोड पूल, प्रेमनगर नाला (मालाड), ओशिवरा नाला (एस. व्ही. रोड), 120 फूट लिंक रोड (मालाड), फॅक्टरी लेन (बोरिवली), कन्नमवार नगर (विक्रोळी पूल).

वापरासाठी बंद केलेले पूल – पाइपलाइन सर्व्हिस रोड पूल (हंस भुग्रा मार्ग), मज्जास नाला पूल (धोबी घाट), वालभट्ट नाला पूल (गोरेगाव पूर्व) , इराणी वाडी पूल (रगडा पाडा), एस.व्ही.पी.रोड (कृष्णकुंज बिल्डिंगजवळील पूल), आकुर्ली रोड पूल, कुरार व्हिलेज पूल, पिरामल नाला पूल, नीलकंठ नाला पूल (घाटकोपर), एसबीआय कॉलनी वैभव को-ऑप सोसायटी, लक्ष्मीबाग कल्व्हर्ट (घाटकोपर).

आपली प्रतिक्रिया द्या