फी भरली नाही म्हणून शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यांच्या घरी पाठवला

6

सामना प्रतिनिधी। मुंबई

पालकांकडून अवाच्या सव्वा फी उकळणाऱया दहिसरच्या रुस्तमजी टुपर्स शाळेचा मनमानी कारभार सुरूच आहे. मार्चमध्ये शालेय शिक्षणमंत्र्यांनी वाढीव फीसंदर्भात पाठविलेल्या पत्राला उत्तर न देताच या शाळेने फी न भरलेल्या सुमारे 30 विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देऊन या विद्यार्थ्यांचे नाव पटावरून कमी केले आहे. शाळेचा हा प्रताप समजल्यावर पालिका शिक्षण विभागाने शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली असून शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव का सादर करू नये, याबाबतचा खुलासा सादर करण्यासाठी शाळेला सात दिवसांची नोटीस बजावली आहे.

रुस्तमजी टुपर्स शाळेविरोधात लोकप्रतिनिधी आणि पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मार्चमध्ये शाळेला 2015-16 पासूनचा लेखापरीक्षण अहवाल, वर्षनिहाय नफा-तोटा, पुढील दहा वर्षांतील वाढीव फीची टक्केवारी, पीटीएने मंजूर केलेल्या वाढीव फीसंदर्भातील कागदपत्रे आणि पहिलीची बेसिक फी कोणत्या कारणामुळे वाढवली आहे याचा खुलासा सादर करण्यास सांगितले होते, मात्र एप्रिल महिना आला तरी शाळेने खुलासा केलेला नाही. खुलासा सादर करेपर्यंत व त्यावर कार्यवाही होईपर्यंत शाळेने कोणत्याही विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखल देऊ नये, अशा सूचनाही शाळेला देण्यात आल्या होत्या तरीही शाळेने काही विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला दिल्याची तक्रार होत आहे.

पत्र महापालिकेचे; खुलासा शिक्षण उपसंचालकांना

22 एप्रिल रोजी शिक्षणाधिकारी यांच्या दालनात रुस्तमजी शाळा व्यवस्थापनाने शिक्षणमंत्र्यांनी मार्चमध्ये दिलेल्या सूचनेनुसार व्यवस्थापनाने शिक्षणमंत्री तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयाला खुलासा पाठविण्याचे तोंडी सांगितले. पण यावर आक्षेप घेत पालिका शिक्षण विभागाने या कार्यालयातही खुलासा सादर करणे अपेक्षित होते, असे शाळा व्यवस्थापनाला सांगितले. सदर बाब गंभीर असून शाळेने याप्रकरणी सात दिवसांत खुलासा करण्याची मागणी केली आहे.