MCA क्लीन बोल्ड , निवड समितीचा सामूहिक राजीनामा

सामना ऑनलाईन, मुंबई

क्रिकेट संघाच्या हिंदुस्थानातील विविध वयोगटांच्या क्रिकेट स्पर्धांमधील सुमार कामगिरीचे पडसाद शुक्रवारी उमटताना दिसले. रणजी व 23 वर्षांखालील निवड समितीचा प्रमुख अजित आगरकर याच्यासह नीलेश कुलकर्णी, सुनील मोरे व रवी ठक्कर यांनी सामूहिक राजीनामा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (एमसीए) सुपूर्द केला. त्यामुळे राजेंद्र लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारण्यासाठी टाळाटाळ करीत निवडणूक प्रकिया पुढे ढकलणारी एमसीए क्रिकेटच्या पिचवर पुन्हा एकदा क्लीन बोल्ड झाली आहे.

मुंबईच्या निवड समितीवर संघनिवडीवरून आरोप करण्यात आले होते. तसेच खेळाडूंचा खेळ मैदानात प्रत्यक्ष जाऊन न बघता मुंबई संघाची निवड केली जाते, अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली. निवड समिती आपली जबाबदारी चोख बजावत नसल्यामुळे एमसीएच्या सदस्य क्लब्सकडून काही महिन्यांपूर्वी विशेष सर्वसाधारण बैठक घेण्यात आली होती. यात निवड समिती सदस्यांना काढून टाका, अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती.

द्वैवार्षिक निवडणूक अद्याप न झाल्यामुळे एमसीएचा कारभार ‘रामभरोसे’ सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर कार्यकारिणीचा खेळ संपुष्टात आलाय. अशा परिस्थितीत निवड समितीच्या सामूहिक राजीनाम्यानंतर एमसीएचा पाय आणखीनच खोलात गेलाय.