ज्येष्ठ नागरिक ठरताहेत सायबर क्राईमचे बळी

2

सामना प्रतिनिधी। मुंबई

ऑनलाइन व्यवहार करणारे ज्येष्ठ नागरिक सध्या सायबर क्राइमचे बळी ठरत आहेत. कांदिवलीतील एका वयोवृद्धाला विमा पॉलिसी बँक खात्याशी लिंक करण्याच्या नावाखाली मोठा चुना लावण्यात आला. या फसवणुकीप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्वी सायबर भामटे हे लॉटरी, बक्षीस लागल्याच्या नावाखाली फसवणूक करत होते. पण आता हे भामटे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना टार्गेट करीत आहे. कांदिवली येथे राहणारे तक्रारदार हे सेवानिवृत्त असून त्यांना एका विमा कंपनीची पॉलिसी घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी गुगलवर एजंटचा नंबर सर्च केला. त्या नंबरवर तक्रारदारांनी फोन केला. कॅशलेस पॉलिसीच्या प्रस्तावाचे आमिष दाखवत विमा पॉलिसी बँक खात्याशी लिंक करावी लागेल असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवत तक्रारदारांनी त्यांच्या बँक खात्याचा नंबर दिला. नंबर देताच तक्रारदारांच्या मोबाईलवर ओटीपी ( वन टाइम पासवर्ड) आला. तक्रारदारांनी तो ओटीपी नंबर एजंटशी शेअर केला.

दुसऱया दिवशी तक्रारदारांना मोबाईलवर खात्यातून पैसे वजा झाल्याचा मेसेज आला. तेव्हा तक्रारदारांनी बँकेशी संपर्क साधला. फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

वृद्ध सर्वात सोपे टार्गेट

सायबर गुह्याकरिता ज्येष्ठ नागरिक हे सर्वात सोपे टार्गेट असतात. ज्येष्ठांना बँक आणि विमा कंपन्यातून प्रतिनिधी बोलतोय असे सांगून त्याच्याकडून गोपनीय माहिती काढली जाते. बँकेचा प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ नागरिक त्यावर विश्वास ठेवतात. माहिती मिळाल्यावर त्याच्या बँक खात्यावर अज्ञात चोरटे डल्ला मारतात.

बँक किंवा विमा कंपनी ग्राहकांना कुठलेही फोन करत नाहीत. जर बँकेच्या नावाने कोणी फोन केल्यास अशा वेळी माहिती देणे टाळावे.- ऍड. प्रशांत माळी, सायबरतज्ञ